पान:सफर मंगळावरची.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकानं सुरी नाहीतर ब्लेड आणायचं का विचारलं.
 “ऐ नको. त्याचा गळा कापला तर?" दुसरा म्हणाला.
 " मगं आता ?" तिसरा म्हणाला.
 "थांब, म्या बघतू. तुमी भायीरच थांबा. "
 त्यातल्या त्यात थोराड अन् विचार करणाऱ्या मुलानं म्हटलं. त्यानं सावकाश ते पासबुक हातात घेतलं न् डोक्यातनं बाहेरं काढलं. वरच्या बाजूनं निघालं तरी डोक्याखालची बाजू तशीच होती. आता काय करायचं? हळूहळू काढली तरी तो जागा होणारच. काय करावं? त्याला वाटलं असा बी जागा होणार तसा बी जागा होणारच... मग त्याने तो डोक्याखाली अडकलेला दोरा खसकन ओढला न् धुमचकाट पळाला. सगळी मुलं त्याच्यामागं पळाली. त्या कालव्याने विठू जागा झाला. डोक्याला झटका बसला होताच. त्यानं तो नीट जागा झालेला. हातात पुस्तक नव्हतं. सहज सवयीनं त्यानं गळ्यात चाचपून बघितलं. तर गळ्यातही नव्हतं. त्यानं बघितलं, इकडंतिकडं कुठं पडलंय का ? कुठंच दिसेना. अंगणात बघावं म्हणून तो बाहेर गेला, तर दार उघडंच. असं कसं दार उघडं राहिलं ? चोर आले की काय? आता मात्र गडी धास्तावला. चांगलाच टकटकीत जागा झाला. तेवढ्यात त्याला खुसफुस ऐकायला आली. नीट कान दिला तर पोरं हसल्यासारखा आवाज होता. जरा पुढं जाऊन बघितलं तर पोरंच होती. आता ती जोराजोरात खिदळत होती. तो मग पोरांच्या मागे धावत सुटला. एकाला पकडलं की तो म्हणायचा, त्याच्याकडं हाय. त्याला पकडलं की तो तिसऱ्याचं नाव सांगून सुटायचा. विठू कावून गेला. तो रडत रडत मालकाकडं गेला. एवढ्या रात्री हा आलेला बघून मालक वैतागला. पण पासबुकाची काळजी मालकालाही वाटलीच. मालक म्हणाला. "कुठली पोरंयत त्यांची नांव सांग, बघतो एकेकाकडं. "
 "अंधारात कायच दिसलं न्हाय."

 त्याला अंधारात चेहरे नीट दिसले नाहीत पण आवाज ओळखायचा किंवा त्यांची नावं माहीत असण्याचा तरी काय संबंध. तो नुसता रडत होता. चपल्या घालत मालक 'चल' म्हणाले. त्यांच्या आवाजानं मालकीण जागी झाली. असं निम्म्या रातीला मालक कुठं निघालेयत म्हणून तिनं विचारलं. तेव्हा मालक म्हणाले, "ह्या विठूचं पासबुक पळावलंय पोरांनी. वांड पोरं, उगा गरीबाला छळत्याती. " मालक पोरांना शिव्या देत निघाले. मालकिणीला काळजी वाटली. बिचाऱ्या गरीबाचं पुस्तक चोरून काय मिळणारेय काय माहीत चोरट्यांस्नी. मालकिणीनं

११८