पान:सफर मंगळावरची.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपले पैसे घेतले. आपल्याला लुटलं. तो रडत रडत म्हणाला.
 "मालक, तुमी फसवलं. माझं आता कसं व्हयाचं ?"
 कॅशियरने त्याला समजावून सांगितलं,
 " अरे त्या नोटा फाटक्या होत्या, तसल्या नोटा चालत नाहीत. त्या बदलून नव्या ठेवल्यात. हे रूपये तुझेच आहेत. "
 मालकाने पण त्याला सांगितलं.
 "आरं बाबा खरंच ह्या नव्या नोटा तुझ्याच हाइत . "
 मालक असं म्हणल्यावर त्याचं रडं थांबलं. बारक्या पोरासारखा तो हळूच हसला. आनंदानं त्या नोटा कुरवाळू लागला. तेव्हा मालक म्हणाले,
 "आता ते दुसरे पैसे आणलेले दे, हे आन् ते आसं दोनी मिळून आपण ठेवू बँकेत. त्यांच्या पण नवीन नोटा होतील. "
 विठूने पैरणीच्या खिशातले दोऱ्यांनी बांधलेले नोटांचे छोटेशे बंडल मालकाकडे दिले.
 मालकाने दोरा काढून नोटा मोजल्या. स्लीप भरली. ते पैसे, स्लीप, पासबुक बँकेतल्या काउंटरवर दिले. थोड्यावेळाने त्यांनी पासबुक विठूला परत दिले. ते नवीन पासबूक पाहून विठू हरखून गेला. त्याला मालक म्हणाले,
 “ह्या बँकेत तुझं पैसे जपून ठिवलेत. ते सगळं ह्या पासबुकात लिहिलंय. आता हे पुस्तक नीट जपून ठेव. हरवलं तर पैसं मिळणार न्हाइत."
 "आस व्हय?"
 पुस्तक हरवल्यावर पैसे मिळणार नाहीत म्हणल्यावर विठू धास्तावला. घरी आल्यावर त्याने एक तरटाची पिशवी घेतली. त्यात पासबुक ठेवून शिवून टाकली. नंतर त्याला सुतळीचे बंध करून ती गळ्यात अडकवू लागला. गावातली मुलं त्याच्यामागे लागायची त्यांना ती सवयच होती. तर त्याला वाटायचं पासबुक घ्यायलाच मागं लागत्याती! तो मग छातीवर रूळणारे पासबुक हाताने घट्ट धरून घराकडे पळत पळत यायचा. हल्ली त्याचं कशाकडंच नीट लक्ष नसायचं. तो त्याचं घरही नीट झाडेनासा झाला. मालक थोडी भाकरी द्यायचा तेवढ्यावरच तो राहू लागला. त्यामुळे तो खंगल्यासारखा दिसायचा.

 एकदा पोरांना कळलं त्याच्या पासबुकाचं. तो झोपल्यावर त्याच्या गळ्यातलं पासबुक काढून घ्यायचं त्यांनी ठरवलं. विठू ते मुठीत घट्ट धरूनच झोपायचा. त्याची झोप लागल्यावर मूठ सैल पडणारच की, तरी ते गळ्यातून कसं काढायचं?

सफर मंगळावरची । ११७