पान:सफर मंगळावरची.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पैशांचा. चोरांनी नेलं तर?" मालक आपले सहज बोलून गेले. तर विठू घाबरलाच.
 म्हणाला,
 "नको रे बाबा तसं व्हायला ! चोर तर माझ्याकडं यात्यालंच. मालक मग वो काय करायचं?"
 "पैस बँकंत ठिवायचं ?"
 " मालक कुठय बँक, कसं ठिवायचं?"
 “आता हिच्या भन, ह्याला तर कायच ठावं न्हाय. तुला बँकेत खातं उघडून देतो. माझ्याबरोबर तालुक्याला ये."
 विठूनं मालकाच्या मदतीनं बँकेत खातं उघडलं. त्याच्या कष्टाच्या कमाईची दौलत घराच्या कोपऱ्यात पुरून ठेवलेली, ती बँकेत ठेवली. घरात पुरून ठेवलेले पैसे वरचेवर उघडून बघायचा. सगळीकडं सामसूम झालं की हा खड्डा उकरून बघायचा. तिथली जागा मऊ भुसभुशीत झालेली. एकदा उंदराने ती जमिन उकरलेली. दोऱ्याने गुंडाळलेली नोटांची गड्डी पत्र्याच्या डब्यात ठेवायचा विठू. डबा उंदराला कुरतडता आला नाही म्हणून पैसे वाचले. तेव्हापासून तो मग नीट जागा सारवायचा. ह्या व्यापातून त्याला अंघोळीला न् कपडे धुवायला कसा काय वेळ मिळेल? आता बँकेत पैसे टाकल्यावर त्याला बघताच येईनात. तो बेचैन झाला. मग मालकाला येऊन पिडायचा.
 "मालक, पैसं हायीत ना?"
 “आरं बाबा! पैसं नाहीत कुठं जायचं, तू काळजी करू नगंस, च्या घे. विठूला दूध घातलेला गोड चहा पिल्यावर हुशारी यायची. आपलं मालक लय चांगलंयत. पण पैसे नीट असत्याल ना? याची चिंता सतावत राही.
 चारपाच दिवस झाले की, पुन्हा मालकाला म्हणायचा,
 " मालक, पैसं बघायला मिळत्याल का ?"
 " बँकेतलं पैसं तसं बघायला न्हाइत मिळत. तुला लागलं तर पाहिजे तेवढं काढता येत्यालं."
 "मला काढायचं नाहीत, नुसतं बघायच्येत . "

 त्याला तो मळक्या नोटांचा बंडल दोऱ्यात गुंडाळलेला दिसायचा. त्याला सारखं वाटायचं, एकदा तरी हातात घेऊन बघावा. तिथं काय केलं आसंल, कसं ठेवलं असत्यालं आपलं पैसं. एवढ्या सगळ्या लोकांच्या पैशात माझं पैसं कसं ठिवलं असत्याल? असं नाना प्रश्न त्याला बेचैन करीत. आठवड्यांचा पगार

सफर मंगळावरची । ११५