पान:सफर मंगळावरची.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विठू वारकरी


 एक छोटं गाव होतं. तिथं एक विठू नावाचा गरीब माणूस राहायचा. तो नेमाने पंढरपूरची वारी करायचा. म्हणून त्याला सगळे विठू वारकरी असंच म्हणायचे. विठू फार कष्टाळू होता. तो राहायचा ती झोपडी गावाबाहेर होती. तुराट्याच्या कुडाच्या भिंती वर गव्हाच्या काडांचं छप्पर. जमीन शेणानं सारवलेली. तो एकटाच झोपडीत राही. पाणी ठेवायला एक माठ, भात शिजवायला एक पातेलं, जेवायला एक ताट, एक वाटी, एक तांब्या. झाला त्याचा संसार. तो रोज भात शिजवून खायचा. त्याला भाकरी करायला येत नव्हती मग रोज तांदूळ आणायचे. तेवढेच शिजवायचे, न् खायचे. तो रोजगाराचे पैसे साठवायचा. ते झोपडीतच एका कोपऱ्यात पुरून ठेवायचा. विठूच्या झोपडीच्या दाराला नव्हते कुलूप. तुराट्यांचाच झाप करून, तो दाराला उभा करून लावी अन् दोरीनं बांधून टाकी. फटीतून एखादं कुत्र्याचं पिल्लू आत जायचं आणि उरलेला भात खायचं. म्हणून विठू भात शिल्लकच ठेवायचा नाही. एकदा तर पिल्लानं हगून घाण करून ठेवलेली. विठू दमून यायचा. दार उघडल्यावर त्याला घाण वास आला. खूप चिडला, पण करणार काय.... घाण तर काढायलाच पाहिजे. त्याने मग घाणीवर माती टाकली. गंजलेल्या मोडक्या घमेल्यात ती घाण भरली. आणि लांब नेऊन टाकली. येताना शेण शोधून आणलं. जमीन शेणानं सारवली. हात धुतला. मग चूल पेटवून भात शिजवला, खाल्ला.

 उन्हाळ्यात विठू छप्पराची डागडुजी करून घ्यायचा. कुठून तरी गव्हाचे काड आणायचा. जिथं जिथं छपराला भोसका पडलाय तिथं तिथं काडाची पेंडी ठेवून घट्ट बांधायचा. कुठं भिताडाची पडझड झाली असेल तर तिथं तुराट्याचा कुड तयार करून लावायचा आणि भिंत उभी करायचा. मग शेणामातीचा चिखल तयार करून भिताडं लिंपून घ्यायचा. दुसऱ्या दिवशी पांढऱ्या मातीनं सारवायचा. वर्षातून एकदा एवढी डागडुजी केली की दररोज मजुरीनं कामाला जायला विठू मोकळा झाला. हिवाळ्यात, उन्हाळ्यात धूळ यायची. पावसाळ्यात थोडं तरी गळायचं. पण तो फारसं लक्ष द्यायचा नाही. केरसुणीला पैसे घालवण्यापेक्षा

सफर मंगळावरची । ११३