पान:सफर मंगळावरची.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "व्हय गुर्जी, तुमी म्हणूनच सुधरवलं बघा गौरीला. न्हायतर आमच्याच्यानं कुठलं झालं आसतं वं? पोरगी वाया गेली असती.” गौरीची आई गद्गद्ल्या आवाजात म्हणाली. "गौरी अगं पाया पड गुर्जीच्या."
 गौरी पाया पडून आत गेली. चुलीवर चहा ठेवू लागली. गुरूजी बाहेरून म्हणाले, "गौरी बाहेर ये पाहू. चहा नंतर कर."
 गौरी बाहेर येऊन बसली. गुरूजी बोलू लागले, "तुला कळले ना. नीट अभ्यास केला, चांगले राहिले की कसं सगळे चांगले वागतात ते. आपले नाणे खणखणीत असले की कुणाची टापय बोलायची ! आपणच ठरवायचं असतं, घडायचं का बिघडायचं! थोडेसे बिघडल्यासारखे वागले की लोक बोलून बोलून आणखी बिघडवतात. ते म्हणतात ना, 'बोटे घालून मोठे करणे' असा प्रकार असतो लोकांचा. म्हणून आपले आयुष्य चांगले कसे होईल हे बघायचे. आपले बघून दुसरे पण चांगले वागतील. आहे का नाही! चुकांतून शहाणपण येते. पण त्याच त्याच चुका सारख्या करणे म्हणजे मुर्खपणाच असतो. प्रयोग करायचे, स्वतःला, इतरांना प्रश्न विचारायचे, त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करायचा. दुसरे करतात म्हणून आपण करायच्या आधी स्वत:ला प्रश्न विचारायचा, तसे का करायचे ? तसे करण्याने भले होणारेय का ? आनंद मिळणारेय का ? आपल्या भल्यासाठी, आनंदासाठी दुसऱ्यांचे नुकसान होत नाही ना, कुणाला त्रास होत नाही ना? कुणाची फसवणूक होणार नाही ना ? असा विचार करता यायला हवा. असंच का ? तसंच का? असे प्रश्न पडायला हवेत. विचार केला की उमजत जाते हळूहळू. सगळे नाही पण थोडे थोडे तरी. या प्रश्न पडण्यानेच शास्त्रज्ञांनी एवढे शोध लावलेत. फार बोललो. आता भूक लागली बोलून बोलून. गौरी तुला पोहे करता येतात ना ? कर मग. "
 गौरीने केलेले पोहे खाऊन, गुरूजींनी तिचं कौतुक केलं. गार्गी, गौरी तिचे आईवडिल सगळे खूश झाले.
 आता गौरी खेळ, अभ्यास, स्वयंपाक असं सगळ्यातच हुशार झाली आहे.

***
११२\ सफर मंगळावरची