पान:सफर मंगळावरची.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बोलायचे. आई धपाटे घालणार. मैत्रिणी चेष्टा करणार, शिक्षक उंडगी म्हणून दुर्लक्ष करणार, नाहीतर जरा काय चुकलं की शिक्षा देणार. मग सगळ्यांचाच राग यायचा. कायच करू वाटायचं नाही! आपण अशाच असणार! आपण मुळीच चांगले नाहीयोत ! आपल्याला सगळे असेच टाकून बोलणार! गार्गीचं मात्र सगळीकडं कौतुक चाललेलं असतं! आपलं कशाचच, कुणाला काही वाटत नाही! आज मात्र बाई, गुरूजी किती छान बोलत होते. तिला हुरूप आला. नवं काय काय सुचायला लागलं. रोज लवकर उठून अभ्यासाला बसायचं, गार्गीबरोबर. आईला मदत करायची. पटापटा आवरून शाळेत जायचं. असं ती मनातल्या मनात ठरवू लागली.
 गौरी रोज गुरूजींच्या घरी जायला लागली. नीटनेटकी राहू लागली. टी. व्ही. बघणं बंदच केलं. मन लावून शिकू लागली. घरी आली की बाईंच न् गुरूजींचं गुनगान गायची. तिच्या आईबाबांना वाटलं, कसं का होईना पोर नीट शिकू लागली. मार्गाला लागलं आपलं लेकरू. शेतातनं आणलेला भाजीपाला, गौरीबरोबर यायचा गुरूजींच्या घरी. कधी ज्वारी गव्हाचं चुंडकं गौरीचे बाबा आणून टाकायचे. कसं ना कसं लोकांचं उपकार फेडायचं या भावनेनं ते काहीना काही देत राहायचे. वार्षिक परीक्षा झाली. बाईंना सोडून जावं लागेल म्हणून गौरी, गार्गीबरोबर आजोळीसुद्धा गेली नाही.
 एके दिवशी गुरूजी हातात पेढ्यांचा पुडा घेऊन आले. अंगणातूनच म्हणाले, "गौरीचे बाबा आहेत का घरात ?"
 "हाय की, अरेच्या, गुरूजी तुमी व्हय, राम राम. या या गरीबाघरी कशी काय पायधूळ झाडली ?"
 " तुम्ही कसले गरीब, दोन हुशार मुलींचे वडील आहात. घ्या पेढे खा. ' "पेढं कसलं, मुलगा झाला की काय ?"
 "अहो तुमची गौरी सातवीत पाचव्या क्रमांकानं पास झाली! "
 गौरीच्या बाबाने गुरूजींचे पाय धरले. म्हणाले,
 "आपली न् बाईंची कृपा!"
 “बाईंनी तिला बदलवलं, सुधरवलं. तिनंही ठरवलं आपण बदलायचं. म्हणून सगळं घडलं. कुठंय गौरी. "
 त्यांच्या बोलण्याच्या आवाजानं आई न गौरी बाहेर आल्या, गुरूजी म्हणाले.

 "गौरी धर पेढे खा. तू आमच्या विश्वासाची, शिकवण्याची लाज राखली."

सफर मंगळावरची । १११