पान:सफर मंगळावरची.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "बस ना गौरी. तुझं नाव किती छाने ना. "
 तिथं सतरंजी अंथरलेली. त्याच्यावर अवघडून बसली. बाईंनी तिला पोहे दिले. पोहे बघून तिला खूप बरं वाटलं. तिची आई नेहमी सकाळी चपात्याच करायची. पोहे कधी तरी करायची. म्हणायची. 'एक काम हाय का, कुठं खेळत बसायचं.' गौरीलाच म्हणायची, 'तू करत जा. कवा शिकायची स्वयंपाक करायला.... रदाळी नुसती नांदायला गेल्यावर आयबाचं नाक कापायचं ध्यानय बघ तुझं. किती बोला पालथ्या घड्यावर पाणी!' बाईंनी केलेले पोहे मऊ चवदार झाले होते. ती मन लावून पोहे खाऊ लागली. बाईंनी घरची चौकशी केली. गुरूजी न राहवून म्हणाले.
 "गौरी ! बध उशीरा येण्यामुळे तुला पोहे पण गारच खावे लागले. तुला सगळे चिडवतात. तरी तू असं का राहातेस नीटनीटके राहावे, लवकर सुरुवात तू करावी, आवरायला, टी. व्ही. बघायचा कमी करावा जरा. म्हणजे अभ्यास चांगला होईल. "
 गौरी अचंब्याने त्यांच्याकडे बघायला लागली. ह्यांना कसे कळले, आपण टी. व्ही. बघतो ते. तिची कुचमलेली अवस्था बघून बाईच म्हणाल्या,
 “गौरी, दिवसभर एकटीच असते मी. माझ्या अजून ओळखी झाल्या नाहीत. तू येशील का आमच्याकडे अभ्यासाला ? तुझा अभ्यासही होईल न् मला पण करमून जाईल. "
 "अगं गौरी तू खेळात खूप चांगलीय. पण आपल्या खेड्यात काय उपयोग आहे का ? तुझे आईवडील फार श्रीमंत नाहीत. तुला नीट अभ्यास करून, नीटच शिकायला नको का? तू हुशार आहेस पण आळशी आहेस. तू नीट शिकली नाहीस तर तुला माहितेयना, इथं घरी बसलेल्या मुलीचं लग्न करतात ते."
 गौरी त्या कल्पनेनंच भेदरली. तिनं कसेबसे पोहे संपवले. ताटली आत नेऊन, धुवून ठेवली. तिचं वळण बघून, तिची निरागसता बघून, बाईंना ती आवडली. बाई म्हणाल्या, "आता गेले ते दिवस. इथून पुढं मीच घेत जाईन तुझा अभ्यास. शाळा सुटली की येशील ना ?"
 "आईला विचारून बघते. "

 गौरीला आपण एवढं शुद्ध मराठी कसं काय बोललो, याचंच आश्चर्य वाटलं. तिला बाईंच्या आपुलकीनं छान वाटलं. आजपर्यंत एवढं जिव्हाळ्यानं कधीच कोण बोललं नाही की कधी काही सांगितलं नाही. सगळे नेहमी खेकसतच

११०