पान:सफर मंगळावरची.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अक्षर सातवीतल्या सुद्धा मुलांचं नव्हतं. त्यांनी गार्गीची वही सगळ्या वर्गात फिरवली. सगळ्या शिक्षकांनी गार्गीचं तोंड भरून कौतुक केलं. सातवीच्या वर्गात तिची वही आली. सातवीला मणेरगुरूजी वर्गशिक्षक होते. त्यांनी गार्गीची वही घेऊन सगळ्यांना दाखवली. तेव्हा गौरी म्हणाली,
 "माझीच बहिणे ती. "
 "मग बहिणीकडून शिका जरा, अक्षर कसं चांगलं काढायचं ते!" मणेर गुरूजी म्हणाले. गौरी हिरमुडून गेली. तिचा चेहरा पडला. त्यामुळे गुरूजींनाही वाईट वाटले. पण आता बोलून गेले होते. विद्यार्थ्यांना चुकलं, माफ करा वगैरे म्हणायची पद्धतही नाही. पण मनात राहून गेले. त्यांना गौरीबद्दल सहानभूती वाटली. तिला टोचून बोलायचं त्यांनी कमी केलं.
 मणेर गुरूजीचं नवीन लग्न झालेलं. त्यांच्या बायकोला भेटण्यासाठी सगळ्या मुलींनी टुमणं लावलेलं. आम्हाला बाईंना बघायचंय... वगैरे. एका रविवारी त्यांनी मुलींना भेटायला बोलावले. गुरूजींनी बोलावलंय म्हणून मुली हरखून गेल्या. स्वच्छ इस्त्री केलेले कपडे घालून. अगदी नट्टापट्टा करून, ठरल्याप्रमाणे रविवारी दुपारी चार वाजता मुली निघाल्या. जाता जाता गौरीला हाक मारली, तर ह्या महाराणी टी. व्ही. पुढं लोळत होत्या. मुली म्हणाल्या,
 " अशा अवतारात नको बाई येऊस. सगळं नीट आवरून ये."
 असं म्हणून गेल्या सगळ्याजणी. गणवेषाव्यतिरिक्त, तिला दोनच वापरायचे कपड्यांचे जोड होते. एक वाळत टाकलेला, एक अंगावर. मग तिने वाळत टाकलेला तसाच इस्त्री न करताच घातला. वेणी घातली. आणि गेली गुरूजींच्या घरी. ती जाईपर्यंत मुली जायला निघालेल्या. त्या निरोपाचं बोलत होत्या. हिला काय करावं ते कळेना. ती मागेच उभा राहून बाईंना बघू लागली. तिला वाटलं जावं आताच ह्यांच्याबरोबर माघारी परत. तेवढ्यात गुरूजींचे लक्ष गेलं तिच्याकडं. त्यांनी तिला आत बोलावलं. ती दबकतच आत गेली. मुली गेल्यावर गुरूजींनी बाईंच्याबरोबर तिची ओळख करून दिली,
 "ही गौरी, हिच्यामुळे आमचा वर्ग कबड्डी, खो खो मधे नेहमी जिंकतो. पण शाळेत मात्र नेहमी उशीरा येते. "

 त्यामुळे तिचा फुललेला चेहरा पुन्हा पडला. तिला वाटलं उगाच आपण थांबलो. सगळ्यांबरोबर गेलो असतो तर बरं झालं असतं. ती अवघडून उभी राहिलेली. निघावं आता, या विचारात. मग बाईच म्हणाल्या.

सफर मंगळावरची । १०९