पान:सफर मंगळावरची.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सांडलवंड करत एकदाचं आटोपलं. गार्गी आवरून कितीतरी वेळ तिची वाट बघत होती. गार्गीचं नेहमीच लवकर आवरायचं. तिला लवकर जायचं असायचं. पण आईची सक्त ताकीद होती, दोघींनी मिळूनच जायचं न् येयचं.
 भलताच उशीर झालेला. गार्गी चिडलेली. दर शनिवारी हाच गोंधळ. गौरीनं सावरून कसातरी कंगवा फिरवला. केसांचं टोपलं थोडं खाली बसलं. दप्तर न तपासता घेऊन निघाली. तरी बरं गार्गीनं स्वतःच्या डब्याबरोबर तिचा डबा, पाण्याची बाटली तयार ठेवलं होतं. दोघी पळतच शाळेत निघाल्या. शाळेत पोहचेपर्यंत प्रार्थना संपून, मुलं आपापल्या वर्गात जाऊन बसलेली. सगळे शिक्षक शिक्षकखोलीतून वर्गावर जाण्यासाठी बाहेर पडलेले. तेवढ्यात ह्या दोघी दिसल्या. गौरी मोठी असून तिचे कपडे चुरगळलेले. केस विस्कटलेले. वेणी घातली नव्हती. नुसता अवतार दिसत होता. गार्गी मात्र एकदम टापटिपीत होती. गार्गी अभ्यासात पण हुशार होती. तिचा पहिला नंबर कधी चुकला नाही. त्यामुळे सगळ्या शिक्षकांना तिचं कौतुक वाटे. गौरी सातवीत तर गार्गी चौथीत होती. गौरीचे दंगामस्ती करणं, वरचेवर शाळा बुडवणं, गृहपाठ न करणं असं नेहमीच चाले. जेमतेम कशीतरी पास व्हायची. डिसेंबर जानेवारीमधे खेळांच्या स्पर्धा असत. तेव्हा मात्र गौरी कबड्डी, खो खो, लंगडीत पुढे असायची. गौरीमुळेच संघ जिंकायचा. स्पर्धा संपल्या की झालं तिचं कौतुकही संपलं. एरवी तिच्या खोड्या, उनाडक्याच सगळ्यांना दिसायच्या. आताही देवकाते गुरूजींना ह्या दोघी येताना दिसल्या. वर्गात जाणार तेवढ्यात सगळ्यांना उद्देशून गुरूजी म्हणाले,
 “बघा! बघा दोघी बहिणी. गौरी मोठी असून तिचा अवतार बघा ! गार्गी लहान असून कशी नीटनेटकी आलीय. शिवाय अभ्यासातही हुशार. गौरीसारखे नाही, काठावर पास ! "
सगळे शिक्षक तिच्याकडे बघून हसत आपापल्या वर्गात निघून गेले. गौरीला ह्या असल्या बोलण्याची सवय झालेली. ती कोडगीच झालेली म्हणा ना! नाहीतर स्वतःला सुधारण्याचा थोडा तरी प्रयत्न नसता का केला तिनं ! उलट ती जास्तच वांड होत चाललेली. त्यामुळे अभ्यासात मागे. दोघीही आपापल्या वर्गात जाऊन बसल्या.

 मुख्याध्यापक शाळेत आल्यावर प्रत्येक वर्गात जाऊन बघत कसं कसं चाललंय. चौथीच्या वर्गात गेले. त्यांनी सगळ्या मुलांच्या वह्या तपासल्या. गार्गीची वही बघितली. सुंदर, स्वच्छ अक्षर खाडाखोड नाही. गिचमीड नाही. एवढं सुबक

१०८