पान:सफर मंगळावरची.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्न पडायला पाहिजेत


 "आका! उठ ना लवकर उशीर होतोय."
 गार्गी कपडे घेऊन न्हाणीत आंघोळीला गेली. तरी गौरी उठेना. आज शनिवार सकाळची शाळा. लवकर उठून आंघोळ, वेणी आटोपून चहा, नाष्टा करायलाही एवढा वेळ लावी... काही विचारायची सोय नाही. रात्री टी. व्ही. वरचे सगळे कार्यक्रम बघणार. आईबाबा शेतात कामाला जायचे. ते थकून लवकर झोपायचे. तरी ही आपली उशीरापर्यंत जागीच. आता तिच्या डोळ्यावरची झोप काही जात नव्हती. तरी बरं आठवड्यातून एकच दिवस सकाळची शाळा असते. गार्गीची अंघोळ झाली तरी गौरी झोपेतच.
 "गौरी ! उठ ना गं. "
 असं म्हणत तिच्या आईनं तिला बसतं केलं. तेव्हा कुठं तिनं डोळं उघडलं. कशीतरी जाग आली तिला. घाई घाईनं तिनं दात घासले. चहा चपाती खाल्ली.

सफर मंगळावरची । १०७