पान:सफर मंगळावरची.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 घरात मात्र चहात चपाती, खारी, टोस्ट, ब्रेड, सगळ्या प्रकारची बिस्किटे बुडवून सगळेच खातात. मग बाहेरच हे वेंधळ्यासारखे कसे होते? आईचं एवढं ऐकून भूक मात्र वाढत जाते. तिथं गेल्यावर शहाण्यासारखं बसतो. आईबाबांनी केलेली खरी खोटी स्तुती ऐकतो. अगदी शहाण्यासारखं. कधी कधी लाजायलासुद्धा होतं. मग खाण्याच्या ताटल्या येतात. ती शहाण्यासारखी पटकन घेतो. तर आईचे डोळे मोठे होतात. आता काय झालं? तेवढ्यात आई त्या काकींना म्हणते,
 "अहो, तो एवढं नाही घेणार, टाकेल उगीच. थोडं कमी करा."
 ती गरम गरम वाफाळलेली पावभाजी वर अमुलचं लोणी. नाकाडोळ्यात, जिभेवर प्राण एकवटले, त्याचा आस्वाद घ्यायला. माझ्या नकळतच मी म्हटलं,
 "असू द्या खातो मी सगळी. "
 पटकन त्या काकींनी ताटली आत न्यायच्या आत जवळजवळ ओढूनच घेतली अन् खायला सुरुवात सुद्धा केली. आईबाबांकडे खाईपर्यंत बघितलेच नाही. त्यांचे चेहरे कसे झाले असतील हे बघायचे तर जाऊ द्याच पण कल्पना करायला सुद्धा वेळ नव्हता.
 झालं! घरी आल्यावर दरवाज्याचं कुलूप उघडायच्या आधी आईच्या तोंडाचं कुलूप उघडलं, अन् तिचे शब्द. बर्कीच्या धबधब्यासारखे कोसळू लागले. आई जर शंकर असती ना तर नक्कीच तिनं तिसरा डोळा उघडून मला भस्मसात केलं असतं! त्यापेक्षा हा धबधबा बरा ! मी बाबांना हळूच म्हणलं,
 " आणेकरकाकींनी छान केली होती ना पावभाजी. मला खूप आवडली म्हणून सगळी खाल्ली. त्यांची छोटी साक्षीसुद्धा किती चवीनं खात होती. आईला कुठं अशी जमते ?" मग बाबा आईला म्हणाले,
 "जाऊ दे गं. पण खरं सांगू का, वहिनींच्या हाताला चव आहे. त्या सगळेच पदार्थ छान करतात. पांढऱ्या रस्स्याचं विचारलंस का त्यांना."
 आता मोर्चा बाबांकडे.
 "तुम्हाला मेलं दुसऱ्यांच्या घरचं तेवढं नेहमी चांगलं लागतं. मी मरमर एवढं कष्ट करते. तर कवडीची किंमत नाही. कधी म्हणून कौतुक करायचं नाही."
 आईची फुसफुस सुरू. आता मात्र आईच्या डोळ्यातून अंबोलीच्या धबधबा सुरू होतोय की काय म्हणून मी तर भीतीनं गारच पडलो.

***
१०६ । सफर मंगळावरची