पान:सफर मंगळावरची.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असा मी... तसे ते .../७


 कुठल्याही बाबांच्या नवीन मित्रांकडे जायचं म्हटलं की, सुरवातीला मला खूप आनंद व्हायचा. तिकडे गेले की आईबाबा माझे अतिशय कौतुक करतात. असलेले गुण फुलवून सांगतात. तर नसलेले गुणही सांगतात. कधी मजा वाटती कधी वैताग येतो. पण गरम गरम छान पदार्थ खायला मिळतात. त्यांच्याकडे माझ्याएवढंच मूल असेल तर मग खेळायला मजा येती. आता मी मोठा होऊ लागलोय. बालीशपणाचा राग येतो.
 घरातून बाहेर पडलं की आईचं सुरू, 'नीट बैस, हात व्यवस्थित ठेव. नाकात, तोंडात बोट घालायचं नाही. आग्रह केल्याशिवाय खाऊ नकोस. चहा तर पितच नाही म्हणायंच. उगीचच खोटं बोलायला शिकवतात. घरात कधीतरी चहा पितोच ना ! मग पाहुण्यांच्यांकडे एखादेवेळस प्यायला म्हणून काय झालं. त्यांना दुसरा खाऊ देण्याचा उगाच त्रास नको. न्हायतर कसं होतं, मुलं चहा पित नाहीत म्हटलं की, दुसरं काही तरी द्यावं लागतं की नाही ? तसं मी एकदा घरात बोललो. तर आई म्हणाली,
 "बरं, बरं. पण चहात वेंधळ्यासारखं बिस्किट बुडवून खाऊ नकोस."

सफर मंगळावरची । १०५