पान:सफर मंगळावरची.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "आज नेली का रे पोटावरनं सायकल ?
 "नाही." मी वैतागून म्हटलं.
 "मग कधी नेणारेयत ? "
 " मला काय माहीत?"
 "अरे पाटलांच्या धनूच्या अंगावरनं मोटारसायकलसुद्धा नेतात. तो विटा फोडतो हाताने. आणि आपला डॉ. महेशदादा त्याच्या तर पाठीवर मोठमोठे कळक तोडलेले आणि पोटावरनं फटफटी नेलेली मी बघितलंय. माझ्या स्वत: च्या डोळ्यांनी!" आईचं नेहमी असंच सुरू असतं, त्याने हे केलं न् ह्याने ते केलं. आपलं ते कार्ट... अन् दुसऱ्याचा तो बाळू.... असंच सध्या चाललंय. आता मला सांगा पाठीवर बांबू फोडले आणि पोटावरनं फटफटी नेली हे एका दिवसात झालं का? त्यांनी कितीतरी वर्ष सराव केला असेल. त्यांच्या कष्टाचं फळ त्यांना मिळाले. पण आमच्या आईला वाटतं आपल्या दिवट्याचा उजेडच पडेना. तो पडावा म्हणून मग सारखी तुलना करायची. आपला मुलगा शक्तिमान व्हायलाच पाहिजे, त्या अमक्या तमक्यासारखा. पण मी माझ्यासारखा 'मीच' होणारेय. असं काही आईला सांगायला गेलो तर म्हणेल.
 " तोंड उचलून बोलतोय. "
 खरंच रे बाबा आम्हाला कोणीच वाली नाहीये!

***
१०४ । सफर मंगळावरची