पान:सफर मंगळावरची.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असा मी... तसे ते.../६


 प्रत्येकाच्या आईबाबाना वाटतं. आपल्या मुलांनी मोठं व्हावं. आपल्याला मोठं होता आलं नाही, पण मुलांनी मात्र मोठंच व्हायला हवं, आपलं नाव मोठं करावं. त्यांना स्वत:ला काही जमलं नाही म्हणून मुलं लहान आहेत तोवरच त्यांच्या मागे हात धुवून लागतात. सारखं. हे कर, ते शिक, ह्या शिकवणीला जा, त्याचा सराव कर. वर अभ्यासाचं टुमणं असतंच सारखं. अगदी घोटून घोटून घेतात. अन् म्हणतात. पहिल्या पाचात तरी यायला हवंच, न्हायतर आमची सगळी घालवाल. आता नंबर नाही आला तर ह्यांची काय नी कशी जाईल कळत नाही. मला तर ह्या मोठ्या लोकांचं काहीच समजत नाही. दुसरं करतात म्हणून आपणही का करायचं ? सगळे पळायला लागले की आपणही त्यांच्यामागे का पळायचं? पळावसं वाटलं नाही तरी ? आपल्याला जे करावसं वाटेल ते करावं. म्हणजे ज्यात मजा येईल, चांगलं आणि वेगळं असावं. जरा हट के. सगळे करतात तेच करण्यात काय मजा ? पण हे आईबाबांना कोण सांगणार? सगळ्यांची मुलं जातात कराटेच्या शिकवणीला, तर घातलं मलाही कराटे क्लासला. शाळेतून दमून भागून यायचं, दिवसभर जीव घुसमटून जातो. काहीतरी खाऊन मुलांच्याबरोबर मोकळ्या मैदानावर मनोसोक्त खेळायचं असतं, तर म्हणे कराटेच्या शिकवणीला उपाशीच जायचं असतं. मग दप्तर आदळून निघायचं तसंच. तिथं हा ऽ ऽ हू ऽ करायचं. पोटात कावळे ओरडत असतात. अन् मनात मी ओरडतो. मला नकोय असली शिकवणी. पण मनातच. कारण काही बोलायला गेलं की, हं, 'कराटेच्या शिकवणीला गेलं की तोंड उचलून बोलायचं असतं का?' इती आई. शिकवणीला गेलो तर तिथे गुरूजींचा पत्ताच नसतो. मग मुलं टिवल्या बावल्या करतात. दंगामस्ती करायला उपाशीपोटी कुणालाच उत्साह नसतो. शिकवणीचा निम्मा वेळ संपून चाललेला. मग गुरूजी येतात. सगळ्यांना रांगेत उभं रहायला सांगतात. कराटेच्या एक दोन कृती करून दाखवल्या. नंतर आमच्याकडून करवून घेतल्या. झालं संपली शिकवणी. जाताना सांगितलं, घरी सराव करा.

 घरी आल्यावर आईचं सुरू झालं,

सफर मंगळावरची । १०३