पान:सफर मंगळावरची.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खुर्ची मला वाटतं ब्युटीपार्लरमध्ये पण असते. तिथं भुवया कोरतात, दवाखान्यात दात. बाबांना कळल्यावर आणखी खरडपट्टी. म्हणजे बघा, काय दुखाखुपायला लागलं तर प्रेम मिळावं, शाळेला, अभ्यासाला सुट्टी मिळावी ते सगळं राहिलं बाजूलाच. सगळ्यांची बोलणी मात्र खावी लागतात. 'पडू आजारी वाटे मौज भारी' ही कविता कवीला कशी सुचली कोण जाणे. वास्तवापेक्षा कवी कल्पनेतच जास्त जगतो की काय कुणास ठाऊक? आमच्या आईबाबांना आजारी कशामुळे पडतात हे माहीत असल्यामुळे आम्हाला नुसती पथ्यपाण्याबरोबर बोलणी खावी लागतात. फारच दुखतेय. ह्या दाढेमुळं काही सुचेना. बाबा काय काय म्हणतील ही एक धास्ती. जरा वेळाने आई हातात कसली तरी पांढरी भुकटी घेऊन आली. अन् म्हणाली,
 "याने दात, दाढ घास, बरं वाटेल. "
 आता जाहिरातीसारखं थोडंच पूड घासली की ठणका कमी होईल का! पण आईला कसं सांगणार? घासली पूड थू ऽऽ थू ऽ ऽ अच्छी स्वादवाली नव्हतीच अन् जडीबुटीवालीही नव्हती. खारट तुरट थ्रू 5 थू 5 माझं तोंड झालं आंबट.
 "अरे मीठ न् तुरटी आहे. त्यामुळे दात दुखायचे राहातात. चूळ भरल्यावर चार तुळशीची पानं चावून खा. रोज असं करायचं जेवणानंतर म्हणजे दवाखान्यात जावं लागणार नाही." हे रोज एवढं करायचं? आता मात्र माझं तोंड कडू कड्डू झालं. त्यापेक्षा दवाखाना परवडला की !

***
१०२ । सफर मंगळावरची