पान:सफर मंगळावरची.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेळ सांभाळलं ते सगळं खड्ड्यातंच गेलं. आई ओरडलीच,
 “काय केलंस रे तिला गाढवा ऽ किती रडतेय बघ ? जा पटकन्, हे पैसे अन् तिला चॉकलेट आण कोपऱ्यावरच्या दुकानातून. त्याशिवाय तिचं रडंच थांबणार नाही. "
 म्हटलं बरं झालं सुटका झाली वर चॉकलेट पण मिळणार. दुकानात निघालो तर अनुजा रडायचं थांबून म्हणाली.
 "दादा, मी पण येते. "
 चॉकलेट म्हटलं की गेलं रडं हिचं. चल, म्हणावंच लागलं. दुकानात गेलो. दोन मेलडी चॉकलेट घेतले. एक अनुजाला दिलं. एक आता वरचा कागद काढून छानपैकी तोंडात टाकणार तेवढ्यात अनुजानं भोकाड पसरलं. आता काय झालं?
 "मला मोठी कॅडबरी पायजे. "
 चॉकलेट फेकून तिथंच ऐश्वर्यासारखा थयथयाट सुरू केला. कॅडबरीएवढे पैसे नव्हते.
 शेवटी,
 "हे माझंही चॉकलेट घे अन् तुझा सुपर डान्स बंद कर."
 तिला असं जोरात ओरडावं वाटत होतं, पण ऐश्वर्याचं मायकेल जॅक्सनमध्ये रूपांतर व्हायला नको म्हणून समजावत म्हटलं,
 "हे घे दोन दोन मेलडी खाव."
 (खुद उपाशी न्हाव.) तिनं फेकलेलं चॉकलेट पुसून दोन्ही तिलाच देऊन कसं तरी शांत केलं. अन् मामा पुता करून घरी आणलं.
 आई घरी एवढं खा खा म्हणते. मावशीकडं आलं की, मात्र माझ्याकडं तिचं लक्षच नसतं. ह्या दोघींचं गप्पांनी पोट भरतं म्हणून काय मी अनुजाच्या रडण्यानं माझं पोट भरावं की काय? ते काही नाही, घरी गेलो की काय तरी खायलाच मागतो. मावशीचे डबेही माहीत नाहीत हातानं घ्यावं तर.
 "आई, भूक लागलीय. खायला दे ना."
 " दुसऱ्यांच्या घरी गेलं की तुला सारखी कशी रे भूक लागते ? खादाड म्हणतील, जरा भूक काढायला शिकावं. "
 सुट्टी म्हणजे असा छळ असतो. खरंच आम्हाला कुणी वालीच नाही !

* * *
१०० \ सफर मंगळावरची