पान:सफर मंगळावरची.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "अरे उतू गेला वाटतं चहा. या घरात गॅसकडे माझ्याशिवाय कुणाचंसुद्धा लक्ष नसतं. रविवारी तरी आयता चहा कोणी देईल का ?"
 झालं आईची मनस्थिती बिघडली. मग एक दिवस दूरच्या नात्यातला दादा आला. त्याला विचारले, शेतकरी, मांजर किंवा इतर सजीव प्राणी वाचत नाहीत तरी ते छान जगतात. मग माणसालाच असं का सांगायचं? तर तो म्हणाला,
 "माणूस हा बुद्धीवान प्राणी आहे ना, माणसाला बुद्धीचीसुद्धा भूक असते. ही बुद्धीची भूक भागवली तरच माणूस नीट जगू वाचू शकेल. हो की नये. तब्येत चांगली राहाण्यासाठी कसं डॉक्टर दूध, अंडी, पालेभाज्या, कच्च्या भाज्या खायला सांगतात. तसं बुद्धी चांगली राहाण्यासाठी अभ्यासाशिवाय अवांतर वाचन करावं. म्हणजे बुद्धी धारदार रहाते."
 "अवांतर वाचन म्हणजे"
 " शाळेतल्या अभ्यासाशिवाय रोजचे वर्तमानपत्र, गोष्टींची पुस्तके, कथा, कादंबऱ्या वाचणे म्हणजे अवांतर वाचन."
 "वा ऽ हे तर लय भारीय."
 मी टुणकन उडीच मारली. मिळतील ती गोष्टीची पुस्तके वाचू लागलो. आईबाबांना वाटलं, पोरगं चांगलंच अभ्यासात रमलंय, म्हणून ते पण टी. व्ही. पहाण्यात रमू लागले.
 एके दिवशी माझे प्रगती पुस्तक मिळाले. गणित-इंग्रजीत नापास, इतिहास, भूगोलात काठावर पास. झालं, बाबांना दाखवलं तर ते घर डोक्यावर घेतील. आईलाच दाखवावं. ती घेईल सगळं समजून. असा विचार केला न् आईलाच दाखवलं. प्रगती पुस्तक बघून ती हादरलीच. मटकन खालीच बसली. मी घाबरलो. काही कळेनाच. थोड्यावेळानं सही केली न म्हणाली.
 “बाबांना दाखवू नकोस न्हायतर तुझ्याबरोबर माझी पण चंपी व्हायची."
 "बाबा विचारतीलंच की, खोटं बोलायचं?"
 "तू नको काहीच बोलू. मी सांगते सगळं बाबांना. पण एवढीच वेळ. पुढच्या परिक्षेत चांगलेच गुण पडायला पाहिजेत. कारण तू अवांतर वाचण्यावरच जास्त भर दिलास. अभ्यास करून मगच अवांतर वाचायचं. कळलं?"
 मी सुटलो, वाचलो. खरंच मला साक्षात्कारच झाला की वाचल्यामुळेच आपण आईबाबांच्या मारातून वाचलो. वाचण्याचा हा पराक्रम चांगलाच आवडला अन् मी मग नेहमीच वाचू लागलो. पण अभ्यास करूनच हं!

***
९८