पान:सफर मंगळावरची.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असा मी... तसे ते.../३


 एकदा कुठं वाचलं बरं ? .... आठवलं. टी.व्ही. वरच. वाचनसुद्धा टी. व्ही. वरच करावं लागतं. 'वाचाल तर वाचाल' हा काय प्रकार मी बाबांना विचारलं, तर बाबा म्हणाले,
 "पुस्तकं वाचली तरच आपण वाचू."
 "कसं काय?" मी म्हटलं.
 "अरे गाढवा, एवढं कसं कळेना? वाचणे म्हणजे अभ्यास अभ्यास केला तरच शिक्षण, शिक्षण असेल तरच नोकरी आणि नोकरी असेल तरच आपल्याला जगायला पैसा मिळेल ना ?"
 "आपलं मांजर कुठं वाचतेय, तरीपण ते जगतेय ना?"
 असं म्हणून बाबांच्याकडं बघितलं तर बाबांनी पाठीत धपाटाच घातला, म्हणाले,
 “या कार्य्याला कसं न् काय सांगावं? नुसता शहाणपणा दाखवतो."
 तरी पण मला चैन पडेना. गावाकडे बैलाने नांगरतात, तो बैल कुठे वाचतो. पण छान नांगरतो. असं आजोबा म्हणतात. ते एकदा म्हणालेले, नांगरट चांगली झाली की पीक पुष्कळ निघते. पीक म्हणजे ज्वारी, गहू वगैरे. तेच खाऊन आपण जगतो. म्हणजे बैल वाचत नाही, आजोबा वाचत नाहीत. पण धान्य पिकवतात. तेच तर खाऊन आपण जगतो. खरं तर शेती केली तरच आपण जगू असं म्हणायला पाहिजे. 'प्रत्येकाने शेती करायलाच पाहिजे.'
 असं घोषवाक्य टी. व्ही. कडे पाठवता आलं तर....
 एकदा आई टी. व्ही. बघत होती. रविवार असल्यामुळे घाईत नव्हती. घाईत असली म्हणजे आई नीट सांगतच नाही काही. नुसती वैतागलेली असते. आता निवांत बसलीय तर विचारूया म्हणून आईला म्हटलं,
 "आई, वाचाल तर वाचाल. म्हणजे कसं गं ?”

 आई वैजयंतीमालाचं 'परदेशी बाबू....' का काय ते बघण्यात गुंग होऊन गेली होती. असं विचारताच एकदम दचकून,

सफर मंगळावरची । ९७