पान:सफर मंगळावरची.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ताईचा वाढदिवस असला की, तिला दोन, दोन ड्रेस, चपलांचे जोड, सँडल्स, मैत्रिणींना हॉटेलात पार्टी. अन् माझा वाढदिवस असला की, फक्त केक न् वेफर्स. मित्रांना बोलावून मजा केली की ताई नाराज. हिला कधी गोंधळ घालता येत नाही. मजा करता येत नाही. दुसऱ्यांनी केलेली बघवत नाही. मित्रांनी दिलेल्या भेटवस्तू बघायला मी सगळ्यांना बोलावतो. मला एवढ्या छान वस्तू, गोष्टींची पुस्तके मिळतात म्हणून केवढा आनंद झालेला असतो, तर या महाराणी काय म्हणतात, तेवढ्याचसाठी वाढदिवस करतोस. असं वाटतं की सगळ्या वस्तू तिच्या डोक्यात नेऊन घालाव्यात.
 पाहुणे आल्यावर तर तिचं एवढं कौतुक चालतं, पाहुण्यांना वाटावं ह्यांना फक्त एकच मुलगी आहे. आमची राणी, चित्रे छान काढते. चित्रे तर मी पण काढतोच की, रंग द्यायला नाही नीट जमत तर काय करणार ? राणी अभ्यासात खूप हुशार आहे, सारखा अभ्यास करते. आता मला सांगा, थोडा अभ्यास करून जास्त गुण मिळवणारा मी हुशार का सारखंच घोकंपट्टी करणारी ताई हुशार ? पण माझं कुणालाच कौतुक नसतं. सारखं ताईचंच कौतुक. असं म्हटलं तर आई म्हणते कशी,
 "अरे, जाऊ दे रे नांदायला गेल्यावर कोण करेल तिचं कौतुक ? ती काय आपल्याजवळ कायमची थोडीच राहाणारे ?"
 म्हणजे जवळ रहाणार नाही म्हणून तिचं कौतुक! मग मी आईला म्हणलं,
 "माझं लग्न झाल्यावर मी पण दूर निघून जाईन. मग तुम्हाला सारखं सारखं भेटणारच नाही.
 आता आईला वाईट वाटेल, डोळ्यात पाणी आणेल, असं वाटलं तर पाठीत धपाटा घालून म्हणते कशी,
 "हात् मेल्या, बायकोच्या ऐकण्यातच राहाणार वाटतं."

***
९६