पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सज्जनगड व समर्थ रामदास.

तांतडीने बरोबर चार वाजतां साताऱ्यास व तेथून सज्जनगडास पायगाडीनें जाण्यास निघालों.
 " सातारा हैं शहर पुण्याच्या थेट दक्षिणेस आहे व साताऱ्याचे थेट दक्षिणेस कोल्हापुर आहे. पुण्याहून सातारा, कोल्हापुर व पुढे बेळगांव हा जुना रस्ता फारच रहदारीचा होता, व याच जुन्या रस्त्यावर सर्व मोठ- मोठीं गांवें वसलेलीं आहेत. सदर्न मराठा रेलवे ज्या मार्गानें नेली आहे तो स्वाभाविक व नैसर्गिक नाहीं. तो खर्च कमी करण्याकरितां व कृष्णा, वेण्या, कोयना वगैरे सह्याद्रिपर्वतांतून निघणाऱ्या नद्यांवरील वेगवेगळे पूल वांचविण्याच्या बुद्धीनें कांहींसा आडमार्गानें व आडरानांतून नेला आहे. मी तर असें ऐकिलें आहे कीं, ह्या रेलवेचा बेत चालला असतां पांच लाख रुपये दिल्यास कोल्हापुराहून आगगाडी नेऊ असें कोल्हापुर-दर- बारला विचारण्यांत आलें होतें. पण कोल्हापुर - दरबारनें अदूरदृष्टीनें तें म्हणणें नाकबूल केलें. रेल्वे रस्ता मिरजेवरून गेला, व मग कोल्हापुर सरकारास मिरजपासून कोल्हापुरच्या फांट्याकरितां तीस लाख रुपये खर्च करावे लागले, हें सांगण्याचें कारण इतकेंच की हल्लीं रेलवेनें प्रवास करणाऱ्या माणसाला या जुन्या रस्त्याची माहिती नसते; पण पुण्याहून साताऱ्यास जाण्यास हाच रस्ता सरळ आहे.
 पुणें हें मुळा-मुठा या नद्यांच्या कांठी असल्यामुळे एका प्रकारें दरींत वसलेलें आहे. त्यामुळे पुण्याहून पायगाडीनें जाणारास प्रथमतः बहुधा चढावाचा रस्ता चालावा लागतो. आम्हांला जावयाचें त्या बाजूला तर कातरजचा मोठा घाट होता. पुणे सोडून चार मैल आल्यावर शहराच्या सरहद्दीवर आंबील ओढा लागतो. रावबाजींच्या कारकादत पर्वतीच्या खालीं रमण्यांत दक्षिणेला जमणाऱ्या भटभिक्षुकांची पुराने तुडुंब भरलेल्या याच ओढ्यांतून रात्री अपरात्रीं जातांना कशी फजिती होत असे, याच्या हरदासी कथा मीं ऐकल्या होत्या; त्यांची मला या वेळीं आठवण झाली. पांचपासून सहा मैलांपर्यंत एक मैलभर फार मोठा चढाव लागतो. ही एक लहानशी टेकड्यांची ओळच आहे. हा चढाव चढतांना फार जड जाते. मुख्य कातरजचा डोंगर व या टेकड्या यांचे दरम्यानचे दरीतच