जितुकें कांहीं आपणास ठावें । तितुकें हळुहळू शिकवावें ।
शाहणे करून सोडावे । बहुत जन ॥
परोपरी शिकविणें । अडणुकां सांगत जाणें ।
निवळ करून सोडणें । निस्पृहासी ।।
होईल तें आपण करावे । न होतां जना करवावें ।
भगवद्भजनेंविण राहावें । हा धर्म नव्हे ॥
आपण करावें करवावें । आपण विवरावें विवरवावें ।
आपण धरावें धरवावें । भजन मार्गासी ॥
विसावा दशक सर्व पारमार्थिक विवेचनाचा आहे व त्यांत थोडक्यांत वेदांततत्त्वाचें सार सांगितले आहे.
पहिल्या समासांत प्राण, मन, पृथ्वी, आप, तेज, वायु आकाश इत्यादि तत्वें व परब्रह्म हीं सर्व व्यापक आहेत तर ती एक आहेत की काय असा प्रश्न करून त्याचें समाधान केले आहे. परब्रह्माखेरीज बाकीचीं तत्त्वें खरीं व्यापक नव्हेत; कारण तीं एकदेशी आहेत; परब्रह्म व पर्वत या दोहोंस अचळ म्हणतात म्हणून ते एक होणार नाहींत; तर खरें व्यापकत्व व अचळत्व परब्रह्माचे ठायींच आहे असें विवेचन केले आहे.
दुसऱ्या समासांत परब्रह्माच्या स्वरूपाचेंच निरूपण पुढे चालविले आहे. दृश्य आणि परब्रह्म यांचा विरोध खालील ओव्यांत दाखविला आहे.
अधोर्ध्व पाहतां चहूंकडे । निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे ।
मन धांवेल कोणीकडे । अंत पाहावया ॥
दृश्य चळे ब्रह्म चळेना । दृश्य कळे ब्रह्म कळेना ।
दृश्य आकळे ब्रह्म आकळेना | कल्पनेसी ॥
अशा ब्रह्मापासून मूळ माया झाली; तिच्यापासून अष्टधाप्रकृति माया झाली व त्यापासून सर्व दृश्य जग झालें असें या समासांत सांगितलें आहे.
तिसऱ्या समासांत मायेपासून पृथ्वी व पृथ्वीपासून सर्व चराचर प्राणि कसे झाले याचें निरूपण करून साधूला खरें ज्ञान प्रत्ययानें होतें व प्रपंचांत काय किंवा परमार्थात काय प्रचीति वांचून बडबड व्यर्थ आहे असें म्हटले आहे.