अवघ्यांस अवघेंचि कळलें । तेव्हां तें रितें पडलें ।
याकारणें ऐसें घडलें । न पाहिजे कीं ॥
मुख्य सूत्र हातीं घ्यावें । करणें तें लोकांकरवीं करवावें ।
कित्येक खल्लक उगवावे । राजकारणामध्यें ॥
बोलके पहिलवान् कळकटे । तयांसींच घ्यावे झटे ।
दुर्जन राजकारणें दाटे । ऐसें न करावें ॥
ग्रामण्या वर्मी सांपडावें । रगडून पीठच करावें ।
करून मागुति सांवरावें बुडवूं नये ॥
खळ दुर्जनांसि भ्याले । राजकारण नाहीं राखिलें ।
तेणें अवघें प्रगट झालें । बरें वाईट ॥
समुदाय पाहिजे मोठा । तरी तणावा असावा बळकट ।
मठ करून ताठा । धरूं नये ॥
दुर्जन प्राणी समजवावे । परी ते प्रगट न करावे ।
सज्जनापरी आळवावे । महत्व देउनी ॥
जनामध्यें दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटपट ।
या कारणें ते वाट । बुझवूनि टाकावी ॥
गलिमाच्या देखतां फौजा । रणशूराच्या फुरफुरती भुजा ।
ऐसा पाहिजे की राजा । कैंपक्षी परमार्थी ॥
तयास देखतां दुर्जन धाके । बैसावे प्रचीतीचे तडाखे ।
बंड पाषांडाचे वाखे । सहजचि होती ॥
हीं धूर्तपणाची कामें । राजकारण करावें नेमें ।
ढिलेपणाच्या संभ्रमे । जाऊं नये ॥
फड समजावणी करणें । गद्य पद्य सांगणें ।
परांतरासि राखणें । सर्वकाळ ॥
ऐसा ज्याचा दंडक । अखंड पाहणें विवेक ।
सावधापुढें अविवेक । येईल कैंचा ॥