पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १० वें. प्रकरण १०वें संध्येपूजेचे मांडणे. अलीकडे पुष्कळ कुटुंबांतून संध्यापूजा वगैरे करण्याचा प्रघात मोडला असल्यामुळे हे प्रकरण लिहिण्याची अवश्यकता नव्हती असें कित्येकांना वाटेल. त्यांनी हे लक्षात ठेवावें की जेथे इंग्रजी शिक्षणाचा व नव्या सुधारकी मतांचा रिघाव झाला नाही अशा पुष्कळ प्रांतांतून नित्यनेमानें संध्यापूजा करण्याची जुनी चाल अनेक घराण्यांतून आहे; आणि इंग्रजी शिकलेल्या लोकांतूनही अलीकडे संध्येपूजेकडे कित्येकांचे परावर्तन होऊ लागलेले दृष्टीस पडू लागले आहे. तेव्हां या विषयाला आजीबात फाटा देऊन चालणार नाही. पुढे मागें जरी संध्येपूजेविषयींचा इंग्रजी शिकलेल्यांचा तिटकारा फैलावत गेला, तरी पूर्वी आपल्या देशांत संध्यापूजा करण्याची रीत कशी होती याचे ज्ञान तरी या प्रकरणावरून पुढच्या पिढ्यांना थोडे बहुत करून घेता येईल.अशा दृष्टीने या प्रकरणाचा समावेश या पुस्तकांत केला आहे. संसारांतलें आपलें मन घटकाभर काढून परमार्थाकडे लावावें अशा उद्देशाने संध्यापूजा करीत असतात. ह्मणून संध्येपूजेची जागा मन एकाग्र होईल अशी एकांत असावी. त्याठिकाणी गलबला नसावा. तेथे अडगळ किंवा अमंगल पदार्थ असूं नयेत. सात्विकभाव व मनाची स्थिरता ज्यांच्या दर्शनाने प्राप्त होतील अशी देवादिकांची, ऋषींची, व साधूंची चित्रे या ठिकाणी असावी. संध्येचे मांडण्यापूर्वी ही जागा झाडून, धुऊन, किंवा सारवून स्वच्छ केलेली असावी. तिच्या मध्यभागी आणि देवाच्या देव्हाऱ्यासमोर रांगोळीचे लहानसें स्वस्तिक काढावें.