पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. प्रकरण ८ वें धुणे. १ मनुष्याच्या आरोग्याला वस्त्रे स्वच्छ राखण्याची किती अवश्यकता आहे ते वर्णन करून सांगण्याचे कारण नाही. आरोग्यासाठी माणसाने स्वच्छ वस्त्रे वापरली पाहिजेतच. पण त्याशिवाय चारचौघांत आपला अमंगलपणा दिसून लोकांनी नांवें ठेवू नयेत आणि आपला तिरस्कार करूं नये ह्मणून ही स्वच्छतेने व नीटनेटकेपणाने राहणे जरूर आहे. २ आपण जी वस्त्रे वापरतो त्यांचे साधारणतः तीन वर्ग करता येतील. १ फारशी न धुतां येण्यासारखी वस्त्रे, २ परटाकडे देण्याची वस्त्रे. आणि ३ घरच्या घरी धुण्यासारखी वस्त्रे. या तिन्ही वर्गातल्या वस्त्रांचा आपण आतां क्रमाक्रमाने विचार करूं. । फारशी धुतां न येणारी वस्त्रे-यांत भारी किंमतीच्या रेशमी, जरीच्या, व लोकरीच्या वस्त्रांचा समावेश होतो. यांतली कित्येक वस्त्रे अशी असतात की त्यांचा रंग किंवा आब न जाऊं देतां धुणे हे आपणांस घरी तर साधत नाहींच, पण परटाला सुद्धां ती चांगली धुतां येत नाहीत. अशा वस्त्रांसाठी युरोपांत ड्राय वॉशिंग (सुकें धुण्याची पद्धति ) नांवाची पद्धति निघाली आहे. पण ही पद्धति अद्याप हिंदुस्थानांत मुंबई, कलकत्ता, अहमदाबाद, आग्रा वगैरे मोठाल्या शहरांखेरीज इतर ठिकाणच्या लोकांना फारशी ठाऊक झालेली नाही. तिचा प्रचार इकडे जारीने सुरू होईल, तेव्हां लोक आपली महावस्त्रे परटाकडे देऊ लागतील, व सोवळयांत वापरण्याची वस्त्रे परटाकडे देऊं नयेत असा जो निबंध आपल्या समाजांत आहे तो ही थोडासा ढिला होईल.