पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महाराजांचे नाव आणि कार्यकर्तृत्व अग्रभागी शोभून दिसणारे आहे. त्यांचे सर्वांत मोठे व भारताला आधुनिक करणारे योगदान कोणते असेल तर ते म्हणजे त्यांनी ज्ञानप्रबोधनाचा भक्कम पाया घातला हे होय! पारतंत्र्यांच्या काळात अनेक थोर व्यक्तींनी सामाजिक-राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले, पण कोणत्याही देशाच्या सर्वंकष उन्नतीचा मार्ग हा सामाजिक व राजकीय उत्थापनापेक्षा ज्ञानाच्या उत्थापनाद्वारे प्रशस्त राजमार्ग होत जात असतो, हे कृतीतून सांगणा-या गायकवाड महाराजांचे उठून दिसणारे द्रष्टेपण आहे. त्यांनी आपल्या संस्थानात १८७५ साली स्वतंत्र शिक्षण विभाग स्थापन करून काही वर्षांतच अस्पृश्य व आदिवासींना सरकारी खर्चाने मोफत प्राथमिक शिक्षण देण्याचा व वसतीगृह देण्याचा जगातला पहिला हुकूम जारी केला आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी १८९२ साली भारतात प्रथमच प्राथमिक शिक्षण सर्व जाती-धर्माच्या मुलांसाठी मोफत व सक्तीचे केले. त्यांनी माणसाचे ऐहिक जीवन प्रगत व समाधानी व्हावे म्हणून सर्वंकष स्वरूपाच्या सामाजिक सुधारणा केल्या, त्यामुळे महात्मा गांधींनी बडोदा - एक आदर्श संस्थान' असा लेख लिहून महाराजांविषयी गौरवोद्गार काढले आहेत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सयाजीरावांनी केलेल्या सुधारणा व बनवलेले कायदे हे तत्कालीन प्रबोधन युगानंतरच्या काळातील अमेरिका व युरोपपेक्षा अधिक प्रागतिक होते, असे लिहून ठेवले आहे.
 रयतेच्या शिक्षणाबरोबर त्यांच्या सांस्कृतिक संवर्धनासाठी महाराजांनी बडोदा संस्थानात सार्वजनिक ग्रंथालयाची चळवळ सुरू केली व गावोगावी ग्रंथालये उघडली. त्यामागे लोकांच्या मनात वाचनाची आवड व ग्रंथप्रेम रुजावे, त्यांनी विचारी, विवेकी व सुसंस्कृत व्हावे हा त्यांचा उदात्त व काळाच्या पुढे असणारा द्रष्टा विचार होता. आपण सारे ज्ञान व साहित्याचे उपासक आहोत, त्यामुळे आपण ख-या अर्थाने महाराजांनी सुरू केलेल्या ज्ञानयात्रेचे वारकरी आहोत, असेच मला महाराजांच्या स्मृतीपुढे नतमस्तक होत म्हणावेसे वाटते.
 महाराजांच्या सर्वच कार्याचा आढावा मी घेणार नाही किंवा उपलब्ध मर्यादित वेळेत शक्यही नाही. पण त्यांनी १८९१ मध्ये ग्रामपंचायतीचा कायदा करून सत्तेचे विकेंद्रीकरण करत बड़ोदा संस्थानाला भारताच्या 'लोकशाहीची प्रयोगशाळा' अशी ओळख दिली. प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेसाठी लोकशाही आवश्यक असते, व त्याची आधुनिक भारतात सयाजीरावांनी सुरुवात केली. लोकशाही व साहित्याचा अन्योन्य संबंध असतो, म्हणून मी या सुधारणेची आवर्जून नोंद घेतो. कारण पुढे माझ्या भाषणात त्याचा संदर्भ येणार आहे, तेव्हा अधिकचे भाष्य मी करीन.

 अहिंसा व सत्याग्रहाच्या अनोख्या आयुधांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणा-या राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि सर्व संस्थाने विलीन करत एकसंघ भारताची

२ / ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन