पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उभारणी करणारे सरदार वल्लभभाई पटेलांची पण भूमी म्हणून मला-तुम्हा-आम्हां सर्वांना ही गुजराथची भूमी प्रिय आहे. 'वैष्णव जन तो तेणे कहीये जो पीड पराई जाने रे' असं म्हणणा-या संत नरसी भगताची पण ही भूमी आहे. महाराष्ट्र व गुजराथ १९६० पर्यंत एक द्वैभाषिक राज्याचे भाग होते, त्यामुळे मराठी व गुजराथी हे बांधव व भगिनी आहेत. महाराष्ट्र हा साखर उद्योगात तर गुजराथ दूध उत्पादनात अग्रेसर आहे, म्हणून महाराष्ट्र व गुजराथचे संबंध दुधात विरघळलेल्या साखरेसारखे मधुर आहेत, म्हणून मी या भूमीला वंदन करतो.
 बडोदा नगरीला साहित्यनिर्मितीची जी समृद्ध परंपरा आहे, तिच्या पाऊलखुणा कै. श्री. गणपतराव गायकवाड महाराजांच्या काळापासून पाहता येतात. त्यांच्या कारकिर्दीत मुद्रणकलेला सुरुवात झाली व त्यांनी ग्रंथनिर्मितीला मोठेच उत्तेजन दिले. ललितानंदांचे सौंदर्य लहरी', अनंतसुत विठ्ठलकृत 'दत्तप्रबोध', विनायक महादेव नातूंचे 'गणेश प्रताप', होनाजी बाळा व सगनभाऊ यांनी बडोद्यात ('वीरक्षेत्री लावण्या' या पुस्तकात त्या समाविष्ट आहेत.) केलेल्या लावण्या या १८ व्या शतकातील काव्यनिर्मितीपासून आपल्याला तिचा उगम पाहता येतो. श्री. सयाजीराव गायकवाड महाराज (तिसरे) यांच्यामुळे बडोदा राज्यात मराठी साहित्यनिर्मितीला नवे चैतन्य मिळाले. 'महाराष्ट्र शब्दकोशा'ला साहाय्य, बहुभाषाकोशा'ची योजना, ‘श्री सयाजी शासन कल्पतरू' हा अष्टभाषी राज्यव्यवहारकोश', 'व्यायामकोशांची निर्मिती' बहुभाषिक, बहुसांस्कृतिक माणसाला संस्कृतिसंवादासाठी असणारी भाषांतराची आवश्यकता व त्यासाठी भाषांतरविषयक अनेक योजनांची आखणी, कम्पॅरेटिव्ह रिलिजनचे 'तुलनात्मक धर्मविचार' हे मूलशंकर माणिकलाल याज्ञिकांनी केलेले भाषांतर (गुजराथी), 'दीघानिकाय'चे मराठी भाषांतर यासारख्या अनेक उपक्रमातून भाषा, साहित्य, इतिहास, संस्कृती इत्यादी अनेक घटकांच्या सूक्ष्म अनुबंधाची तरलस्पर्शी जाणीव व त्या विषयीची सजगता प्रगट होते. येथे अजून एक संदर्भ आवश्यक आहे तो म्हणजे, स्वत: सयाजी महाराजांनी From 'Caisar to 'Sultan' या एडवर्ड गिब्बनच्या पुस्तकावरचा टीकाग्रंथ १९०६ मध्ये लिहिला. ज्याचा मराठी अनुवाद कैसर'कडून 'सुलतान'कडे' या नावाने राजाराम रामकृष्ण भागवतांनी केला. महाराजांचे दुसरे महत्त्वाचे पुस्तक म्हणजे 'नोट्स ऑन फेमिन टूर' होय. त्याचबरोबर शंकर मोरो रानडे यांच्या परिश्रमातून निर्माण झालेली ‘सहविचारिणी सभा' (इ.स. १८८०) व ‘सहविचार' हे नियतकालिक ग्रंथसंपादक

आणि प्रसारक मंडळी' यांनी प्रसिद्ध केलेले विविध विषयावरील बावीस ग्रंथ या वाङ्मय निर्मितीच्या श्रेष्ठ कार्याची नोंद घ्यावी अशी आहेत. हिंदुस्थानच्या इतिहासलेखनात मराठी रियासतींच्या लेखनाचे स्वतंत्र दालन उघडण्याचा सन्मान गो. स. सरदेसाई यांना बहाल करताना, त्यांच्या लेखनाचा आरंभ बडोद्यातून झाला, हे

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / ३