पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करणे व ते वर्षभर कार्यरत ठेवण्यासाठी विद्यापीठ स्तरावरून परिपत्रक काढले जावे. विद्यार्थी परिषद-संसदेचा भाग म्हणून वाङ्मय मंडळाचा एक सचिव विद्यार्थ्यांकडून निवडणुकीद्वारे निवडावा व त्या मंडळात तीन विद्यार्थी व तीन विद्यार्थिनी पण निवडाव्यात. हे मराठी वाङ्मय मंडळ वर्षभरात विद्यार्थी साहित्य संमेलनासह किमान सहा उपक्रम राबवेल. तसेच या मंडळामार्फत साप्ताहिक 'बुक क्लब' चालवावेत, जिथे वाचनप्रेमी विद्यार्थी एकत्र येऊन पुस्तकांवर चर्चा करतील, स्वत:च्या कथा - कविता वाचतील, अधूनमधून प्रसिद्ध लेखकांना गप्पागोष्टींसाठी बोलावतील. कॉलेजस्तरावर एकांकिका स्पर्धा घेणे व एक नाटक बसवणे या माध्यमातूनही विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवू शकेल. मी साहित्य परिषदांना यासाठी पुढाकार घेऊन आपल्या भागातील विद्यापीठांशी संपर्क साधून त्यासाठी 'रिसोर्स इन्स्टिट्यूट - संसाधन संस्था' म्हणून कार्य करण्यासाठी सामंजस्य करार करावा असे सुचवितो. प्रत्येक जिल्हा-तालुक्यात साहित्य परिषदेच्या शाखा आहेत, त्या कॉलेजला आणि वाङ्मय मंडळाला याबाबत सहकार्य करतील
 आता मी सार्वजनिक ग्रंथालये यांच्या कामाबाबत थोडे विचार मांडतो. खरं तर गाव तिथं ग्रंथालय ही संकल्पना अजूनही पूर्णत्वास आली नाही. आजपर्यंत साधारणपणे २५ ते ३० टक्के गावातच सार्वजनिक वाचनालये आहेत. त्यामुळे ग्रंथालय संचालक व उच्च शिक्षण विभागाने या कामास गती व निधी देणे आवश्यक आहे. तसेच सध्या नवीन ग्रंथालयांना मंजुरी देणे थांबवलेले आहे ते योग्य नाही, तरी याचा शासनाने फेर विचार केला पाहिजे.

 कार्यरत ग्रंथालयाच्या ग्रंथपालांनी लेखक व वाचक यांच्यातला दुवा म्हणून काम करावे, त्याने स्वत: उत्तम वाचक निरंतर असावे. त्याने नवीन वाचक निर्माण करण्यासह वाचकांचे वाचन संदर्भात मार्गदर्शक व्हावे, दरमहा एक साहित्य विषयक उपक्रम राबवावा आणि त्याद्वारे वाचन संस्कृती वाढविण्याचे प्रयत्न करावा ही अपेक्षा अवाजवी नाही. यासाठी साहित्य परिषदेने पुढाकार घेतला पाहिजे. माझी अशी योजना आहे की, सार्वजनिक ग्रंथालयांचे नियंत्रक संचालक ग्रंथालय आणि साहित्य महामंडळांनी एकत्र येऊन दरवर्षी ग्रंथपालांची दोन दिवसांची वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी काय व कसे प्रयत्न करता येईल याची कार्यशाळा प्रत्येक तालुक्याला घ्यावी. त्याची जबाबदारी जिल्हा ग्रंथालयांवर सोपवावी. तसेच ग्रंथ खरेदीसाठी काही नियमावली करून केवळ जास्त सूट म्हणून रद्दी पुस्तकांच्या खरेदी ऐवजी चांगली पुस्तके निवडावीत. त्यासाठी साहित्य परिषद पुस्तक निवडण्यासाठी मदत करेल आणि तालुका स्तरावर खरेदी करावयाच्या पुस्तकांची यादी दरवर्षी लेखक -शिक्षक व शिक्षण अधिका-यांनी करावी. म्हणजे वाचनालयात चांगली दर्जेदार पुस्तके राहतील.

४४ / ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन