पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मित्रहो, शालेय - महाविद्यालयीन व सार्वजनिक ग्रंथालये ही केवळ बळकट केली पाहिजेत, एवढेच पुरेसे नाही तर, ती चैतन्यमय व क्रियाशील करण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाचा शिक्षण विभाग, ग्रंथालये व साहित्य परिषदा आणि विद्यापीठे यांनी पण वाचन संस्कृती विकासासाठी धोरण आखणे व कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यासाठी या वर्षभरात मी पुढकार घेऊन याबाबत किमान संवादचर्चा व काही ठिकाणी पथदर्शक उपक्रम घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मी जसा लेखक आहे, तसाच वाचकही आहे व 'वाचक करून सोडावे सकळ जन' हा माझा ध्यास आहे. आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी साहित्य महामंडळाने गांभीर्याने विचार करून व शिक्षण विभाग व विद्यापीठांशी संवाद साधावा, अशी मी या मंचावरून विनंती करीत आहे.
 शासनाला वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी आणखी एक काम करता येईल. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व बँका, खासगी उद्योगसमूहात जिथे शंभरपेक्षा अधिक कर्मचारी काम करतात, तिथे ‘हाऊस लायब्ररी' अर्थात वाचनालये स्थापन करावीत व दरवर्षी ग्रंथखरेदी त्यांच्या आस्थापना खर्चातून करण्याचे अनिवार्य केले, तर वाचन संस्कृतीची कक्षा वाढेल व वृद्धीही होईल. त्यासाठी एक परिपत्रक काढून जिल्हा स्तरावर एक देखरेख समिती निर्माण करावी. या उपायांचे चांगले परिणाम निश्चित पाहायला मिळतील.

 आणखी एक गोष्ट शासन वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी करू शकते, ते म्हणजे पुस्तक विक्री केंद्र प्रत्येक तालुक्यात निर्माण करावीत. खरं तर मी ही योजना कै. य. दि. फडके महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते, तेव्हा सुचवली होती, त्यांना ती पसंतही होती, पण ती अमलात आली नाही. ती योजना थोडक्यात सांगायची झाली तर, अशी आहे - प्रत्येक जिल्ह्यात कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद कार्यालयाच्या व तालुक्याच्या तहसील व पंचायत समिती कार्यालयात मोकळी जागा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. तिथे दररोज शासकीय कामासाठी शेकडो माणसे येत असतात. तिथे शासनाने निर्णय करून जिल्हा नियोजन व विकास मंडळामार्फत जिल्हा व मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी एक हजार स्केअर फुटाचे व इतर ठिकाणी सातशे स्केअर फुटाचे एक पुस्तक विक्री केंद्राच्या इमारतीचे बांधकाम करावे व ती जागा मराठी पुस्तक, मराठी सीडी - गाण्यांच्या विक्रेत्यांना दीर्घ मुदतीने द्यावी. म्हणजे प्रत्येक तालुक्याला मराठी पुस्तके, मराठी गाणी व मराठी चित्रपटांच्या सीडींचे एक हक्काचे विक्रीचे केंद्र उपलब्ध होईल. आज खेडोपाडी शाळा व कॉलेज असल्यामुळे तिथे मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या नवसाक्षराना ज्ञानाची प्रचंड भूक आहे; पण त्यांना नवी ताजी पुस्तके तालुक्यात पाहायला, चाळायला मिळत नाहीत. कारण आजच्या घडीला जवळपास अडीचशे

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / ४५