पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाचलेल्या पुस्तकाची माहिती देणे, जेणे करून प्रत्येक विद्यार्थ्यास ते पुस्तक वाचण्याची प्रेरणा होईल.
 (४) प्रत्येक विद्यार्थ्याने दरमहा किमान एक पुस्तक वाचावे, त्यासाठी प्रोत्साहन देणे व मुलांना त्याचे रसग्रहण लिहिण्यास सांगणे.
 महाराष्ट्रातील चारही विभागाच्या साहित्य परिषदा व शासनाच्या ग्रंथालय संचालक विभागाने एक सामंजस्य करार करावा अशी मी नवी कल्पना मांडतो. त्यानुसार साहित्य परिषदा दरवर्षी प्रत्येक तालुक्यात शालेय ग्रंथपालांच्या किंवा जिथे ग्रंथपाल नाहीत, तिथे ग्रंथालय पाहणा-या शिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन विद्याथ्र्यांत वाचनप्रेरणा कशी निर्माण करता येईल, याचे मार्गदर्शन करतील. हा बार्षिक कार्यक्रम दरवर्षी जून-जुलैमध्ये घेतला तर वर्षभर वाचनासाठी विविध उपक्रम शाळाशाळांमध्ये आखले जातील व ख-या अर्थाने वाचनप्रेरणा निर्माण होऊन विद्यार्थी वाचनसंस्कृतीचा अंगिकार करतील.
 दुसरा एक उपक्रम म्हणजे, साहित्य परिषदांच्या सहकार्याने दरवषी प्रत्येक तालुक्यात शालेय विद्यार्थी संमेलन आयोजित करणे, त्याची संकल्पना अशी सांगता यइल, एका मोठ्या शाळेत (फिरत्या पद्धतीने) हे संमेलन होईल. त्यापूर्वी तीन महिने आधी तालुक्यातील प्रत्येक शाळेत काव्य, कथा, निबंध, विज्ञानपर लेख आणि नाटुकले- नाट्यलेखन अशी स्पर्धा जाहीर करावी आणि वर्गनिहाय प्रत्येकी पाच बक्षीसे जाहीर करावीत. या सर्व बक्षीस विजेत्या विद्याथ्र्यांना शालेय विद्यार्थी साहित्य संमेलन ज्या शाळेत होणार आहे. तिथे शिक्षकांनी सहलीसारखे घेऊन जावे आणि त्यातील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी आपले साहित्य सादर करतील. यामुळे मुलांमध्ये वाचन-लेखन प्रेरणा निर्माण होईल व त्यातून काही लेख़क तर इतर उत्तम वाचक निर्माण होतील. शालेय विद्यार्थी साहित्य संमेलन उपक्रम हा राबविण्यासाठी शासनाने परिपत्रक काढल्यास तो उत्साहाने साजरा होत उद्याचे लेखक-वाचक घडून वाचन संस्कृतीचा विकास होऊ शकेल. तसेच प्रत्येक शाळेने विद्यार्थी व शिक्षकांचे लेखन असणारा वार्षिक अंक काढावा, यासाठी काही अनुदान द्यावे. त्यांच्यात स्पर्धा घेऊन दरवर्षी तालुकानिहाय तीन शाळेच्या अंकांना बक्षीसे द्यावीत.
 खरे तर शाळा तिथे ग्रंथालय आणि एक पूर्ण वेळ ग्रंथपाल असा निर्णय शासनाने घ्यावा व ग्रंथपाल व शिक्षकांमार्फत शालेय विद्यार्थ्यांत वाचनप्रेरणा निर्माण करत वाचन संस्कृती रुजवावी. त्यामुळे शालेय विद्यार्थी हा बहुश्रुत व विचारी बनण्यास मदत होईल.

 आता मी वाचनसंस्कृती विकासाचा दुसरा टप्पा म्हणून महाविद्यालयीन ग्रंथालये याकडे वळतो. महाविद्यालयात ग्रंथपालासोबत भाषा शिकवणारे प्राध्यापक यानी कॉलेज विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ स्थापन

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / ४३