पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणून त्याचा खून झाला. नुकतेच त्यातील सर्व आरोपी पुराव्याअभावी म्हणजे साक्षीदार फितूर झाल्यामुळे सुटल्याच्या घटनेनी दलितांवरील अत्याचाराचा व त्यांना न्यायव्यवस्था योग्य न्याय देत नसल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उनाला गोहत्या केल्याच्या संशयावरून दलित तरुणांना उघडे करून पट्यानं मारणं असो की २०१८ च्या प्रथम दिवशी कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यामुळे जमा झालेल्या लाखो दलित बांधवांच्या अभिवादन समारंभाच्या निमित्ताने झालेली दंगल असो.... उच्चवर्णीय हिंदू समाजास संविधानाच्या शस्त्राने व शिक्षणामुळे आलेल्या आत्मभानातून जागी झालेली दलित अस्मिता सहन होत नाही. कारणे काहीही असू देत, पण पीएच्. डी. करणा-या बुद्धिवान दलित तरुण रोहित वेमुलास आत्महत्या करावी लागते, ही का केवळ त्या समाजाची शोकांतिका आहे? नव्हे, ती सर्व भारताची शोकांतिका आहे. २०१६ मध्ये मी ‘बाटगी विहीर' ही कथा लिहिली होती. त्यात एका गावात दलितांच्या कबड्डी खेळाडूंना लाल मातीत खेळल्यानंतर शरीर स्वच्छ करण्यासाठी गावकरी अंघोळीला पाणी देत नाहीत, तेव्हा ते काही वर्षांपासून बंद पडलेल्या विहिरीतील पाणी उपसण्यासाठी उतरतात व पालापाचोळा कुजल्यामुळे निर्माण झालेल्या विषारी वायूमुळे गुदमरून मरतात.... हा त्या कथेचा आशय आहे. मला एका सत्य घटनेवरून ही कथा सुचली होती व मी ती लिहिली. तेव्हा एका दिवाळी अंकाने ती मध्यमवर्गीय शहरी वाचकांना दिवाळीच्या आनंदात विरजण टाकणारी वाटेल, म्हणून छापायची नाकारली होती. ब-याच वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं जाहीर दहन केलं होतं, त्या स्त्रीशूद्र वर्गास दुय्यमत्व व गुलामी देणा-या ग्रंथाचा आज कोणी जाहीर उच्चार करते नाही, पण वाढते दलित अत्याचार हेच दर्शवतात की, आजही तथाकथित उच्चवर्णीयांच्या मनात वर्णव्यवस्था व त्यामुळे जन्मलेली अस्पृश्यता जिवंत आहे. त्यावर राजकीय पक्ष एक तर भूमिका घेत नाहीत, नाही तर त्याचा राजकीय मतांचं पीक घेण्यासाठी वापर करतात. या दोन्ही अनिष्ट व निंदनीय प्रवृत्ती आहेत, त्याचा आपण साहित्यिक व वाचक म्हणून किती प्रमाणात निषेध करतो? भारताचं हे दुर्दैवी वास्तव आहे की, इथे पाण्यालाही जात असते - आजही आहे. माझ्या ‘पाणी ! पाणी!!' कथासंग्रहात मी पाणी टंचाईचा सामना करताना गावकुसाबाहेरचे दलित, बलदंड व सत्तास्थानी असलेल्या जाती, बहुजन समाज व खेड्यात अगदी अल्प असलेल्या ब्राह्मण समाज यांच्यात जातीच्या उतरंडीमुळे कसा फरक पडत जातो, यावर चारे कथा आहेत. त्यातील दलित व बहुजनांच्या जीवनावर पाणी टंचाईचा किती विपरीत परिणाम होतो, हे मी दाखवायचा प्रयत्न केला आहे.

 मित्रहो, दलित समाजाचा प्रश्न केवळ शिक्षण व रोजगाचा नाही तर, तो आहेच पण त्याहून जास्त त्यांच्या जागृत झालेल्या आत्मभानाचा व अस्मितेचा

२२ / ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन