पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/24

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


नाहीत यासाठी सरकारनं काम केलं पाहिजे, तर समाजानं याबाबत ‘झिरो टॉलरन्स' दाखवला पाहिजे.
 आजची भारतीय स्त्री पण कुठे सुरक्षित आहे? निर्भया प्रकरण ताजं आहे. रस्त्यावर ती बेगुमान झालेल्या पुरुषी वासनेला बळी पडते आहे, पण घरी तरी, ती कुठे सुरक्षित आहे? घरातली मोठी माणसंच आपल्या मुलीबाळींवर अत्याचार करीत आहेत व त्यांची संख्या वाढत आहे. विवाहित स्त्रीला पण नव-याकडून छळ, मारहाण, हुंड्याची मागणी आणि बळजबरी नव्हे बलात्कार यांना हरघडी सामोरं जावं लागत आहे. काय झालं आहे भारतीय पुरुषी मानसिकतेला? जातीबाहेर लग्न केलं म्हणून ‘ऑनर किलिंग' घडवून आणणं, आंतरधर्मीय विवाह केला म्हणून धार्मिक थयथयाट करणं व नवदाम्पत्यास जगणं नकोसं करणं, मुलाच्या हव्यासापायी स्त्रीभ्रूण हत्या करणं, बालविवाह, कुपोषण, मुलीच्या आधुनिक पेहरावाबाबत - मोबाईल वापरण्याबाबत बंदी घालणा-या जातपंचायती, जबानी तलाकाला बळी पडणाच्या मस्लीम स्त्रिया व त्यांना संरक्षण देणे दूर, पण त्याबाबच्या कायद्यावरून राजकारण व धार्मिक तुष्टीकरण करणे...किती व काय सांगावं ? स्त्रियांचे हे सारे प्रश्न पुरुषसत्ताक वर्चस्वाने निर्माण झाले आहेत. त्यावर भारतीय संविधानात उत्तर आहे, तोडगे आहेत व मार्गदर्शक तत्त्वे आहेत. पण आपली राजकीय व्यवस्थाही पुरुषप्रधान आहे, आणि मुख्य म्हणजे ती स्त्रीसाठी फार मोठ्या प्रमाणात अनुदार आहे..... हे माझं निरीक्षण राजकीय टीप्पणी आहे का? आजच्या गढूळ वातावरणात ती जरूर ठरू शकते. अशा स्त्रीसाठीच्या अत्यंत विपरीत परिस्थितीत लेखक- कलावंतांनी स्त्री हक्काची बाजू घेत आवाज उठवला पाहिजे. स्त्री ही शिक्षण घेत स्वावलंबी होत सावित्रीबाई फुल्यांची खरीखुरी लेक होत असताना इथला पुरुष वर्ग बदलत नाही, स्त्रीला समान लेखत नाही व त्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुलेंचा तो वारसदार पुत्र होताना दिसत नाही..... ही आमच्या भारतीय स्त्रीची शोकांतिका आहे.

 आपल्या भारतीय संविधानानं अस्पृश्यतेचे उच्चाटन केले आहे पण सत्तर वर्षे झाली तरी तथाकथित वरिष्ठ जातिजमातीची मानसिकता फारशी बदललेली नाहीय. २०१६ या एका वर्षात लखनौ, हैदराबाद व बेंगळूरू शहरात दलितांवरील अत्याच्याराच्या प्रकरणात मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. ती प्रामुख्याने 'प्रिव्हेंशन ऑफ अॅट्रोसिटीज अॅक्ट' अंतर्गत झाली आहे. याच कायद्यातंर्गत उत्तर प्रदेश, बिहार व राजस्थानमध्येही मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले आहेत. आपल्या महाराष्ट्राची पण परिस्थिती फार चांगली नाही. खैरलांजी ते नगर जिल्ह्यातील मागील काही वर्षांत घडलेल्या अंगावर काटा आणणा-या घटनांची आठवण महाराष्ट्र विसरला नसणार.... नितीन आगे या दलित तरुणाचे त्याच्यापेक्षा उच्च जातीच्या मुलीशी तथाकथित प्रेम किंवा मैत्री आहे, तो तिच्याशी बोलत होता

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / २१