पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असंच शनिवारी वर्कशॉप संपवून सायकलवरून घरी यायला निघाला. तर घराजवळ एका गाडीवाल्यानी त्याला धडक दिली. गाडीवाला पसार झाला. बारक्याला लागलं. सायकलचं चाक पार चेंबलं. एका सद्गृहस्थानी बारक्याला हॉस्पिटलमध्ये नेलं व फोन करून ताईंना कळवलं. ताई कुकर लावायच्या बेतातच होत्या. फोनवरून ऐकताना ताईंना पायातला सर्व त्राण गेल्यासारखं झालं. “कसाय तो, कसाय तो." हेच सारखं फोनवरून विचारत होत्या. त्या इसमानी बारक्याला फोन दिला. बारक्याचा आवाज ऐकून जिवात जीव आला. "आलेच मी" म्हणत लगेच कपाटातून पैसे घेतले व हॉस्पिटलमध्ये गेल्या. बारक्याच्या पायाला ८ टाके पडले. डोक्यालाही थोडं लागलं होतं. डॉक्टरांनी बारक्याला एक दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला सांगितलं. बारक्या घाबरला होता, पण वरवर काही झालं नाही असा आव आणत होता.

 टाके घालणं चालू असताना ताईंनी निमीला फोन केला, पण तिचा फोन बंद होता. रात्री बारक्याच्या आग्रहास्तव थोडं खाल्लं आणि आठवलं, की गोळी घ्यायची राहिली आहे. रात्रीचे अकरा वाजले होते. बटवा काढला, त्यातल्या पुडीतलं औषध घेतलं. पाणी पिलं. बारक्याच्या छान्याशेजारी सिस्टरनी दिलेली सतरंजी टाकून निजल्या. दर तासानी उठून बारक्या नीट झोपलाय ना हे बघत होत्या. रात्रभर झोप नाही. हॉस्पिटलात कसली झोप लागते.

  दुसऱ्या दिवशी सकाळी बारक्यानी त्याच्या मित्रांना फोन केला. मित्रांनी हॉस्पिटलात येऊन विचारपूस केली. “आई काळजी करू नका" म्हणून मंगलताईंना धीर दिला. ताईंनी निमीला फोन केला. निमी हातातलं सर्व काम सोडून आली. दुपारी बारक्याला डिस्चार्ज मिळाला. रिक्षातून त्याला घरी आणलं. ३ दिवसांनी शाळेत जायला लागला.29