पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

की काही झालं तरी गोळी चुकवायची नाही. गोळी घेणं चुकलं तर दुखणं बळावेल आणि मग डॉट्स गोळ्यांचा काही उपयोग होणार नाही. रात्र रात्र खोकल्यामुळे झालेली परेशानी आठवून मंगलताईंनी गोळ्या घेणं चूपचाप चालू ठेवलं.

 

●●●

  मंगलताईंनी नियमाप्रमाणे एआरटी औषधं घ्यायची ठरवली. पहिल्या दिवशी सकाळी पूजा केली व गोळी घेतली. कामावर गेल्या. कामावरून संध्याकाळी घरी आल्या. कुकर लावला व टीव्ही बघत बसल्या. बातम्या झाल्यावर एकदम लक्षात आलं, की गोळी घ्यायची राहिली. घाबरून उठल्या. एक चपाती खाल्ली. गोळी घेतली. पाणी पिलं. पहिल्या दिवसापासून असं विसरायला झालं तर कसं होणार? बारक्या सायकलच्या चेनमध्ये वंगण घालत होता. त्याला म्हणाल्या, "अलार्म कसा लावायचा? मेली सकाळी लवकर जागच येत नाही." "तुला नं काही येत नाही' असं म्हणत बारक्याने अलार्म कसा लावायचा ते शिकवलं. सकाळी ९ वाजता ५-५ मिनिटांवरचे २ अलार्म व संध्याकाळी ९ वाजता ५-५ मिनिटांवरचे २ अलार्म लावले. मोबाइल चार्जिंगला लावला.

  बारक्याला आजाराबद्दल सांगावं का? पूर्वी त्याला सांगायचं मनातही आलं नव्हतं; पण आता त्याला आपल्या आजाराची कल्पना द्यावी असा विचार मनात येत होता. नाही सांगितलं आणि त्यानी गोळ्या पाहिल्या तर, तर तो नक्की विचारणार "कशाच्या गोळ्या ह्या?" आता तो पूर्वीसारखा भोळसट राहिला नव्हता. मिसरूड फुटायला लागली होती. घरी फारसा नसला तरी घरात बारीक लक्ष असायचं. स्वत:वरही