पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खूप देखरेख चालू होती. तासन्तास आरशात बघणं आणि दररोज पैशाची मागणी. कधी नवीन बूट हवेत तर कधी गॉगल हवा. येत्या दिवाळीला तुझ्यासारखा (पण नवीन मॉडेलचा) मोबाइल पाहिजे म्हणून हट्ट सुरू होता. अभ्यासातला नंबर घसरला होता. पूर्वी बरे मार्क असायचे पण मागच्या चाचणीत गणितात नापास झाला होता.

 निकाल घरी आणल्यावर त्यानं बरीच बोलणी खाल्ली होती. "तुझ्या फालतू मित्रांपासून दूर रहा, सगळी वाया गेलेली आहेत." ताई डाफरल्या. पण तो हल्ली सरळ उलट उत्तरं देऊ लागला होता. "तुझ्यापेक्षा बरे आहेत ते." "मग रहा त्यांच्या संगच" असे म्हणून त्यांनी चिडून त्याच्यावर त्याचा निकाल फेकला होता. बारक्या रागानी थरथरायला लागला, दात-ओठ खाल्ले व चटकिनी घरातून बाहेर गेला.

  रात्र झाली तरी घरी आला नव्हता. अलार्म वाजल्यावर अनोशापोटी गोळी घेतली. जेवल्या नाहीत. रात्रभर डोळ्याला डोळा नाही. पण ताईंनी ठाम ठरवलं होतं, की कुठं गेला म्हणून शोधायला जायचं नाही. रात्री गोळीमुळे पोटात आग पडली. काही खाल्लं नव्हतं. थोडं दूध पिलं मग जरा बरं वाटलं. पडून राहिल्या. मनात विचारांचं काहूर. बापासारखा कायमचा तर गेला नाही ना? छातीत एक कळ येऊन गेली. काय एकेक नशिबात भोग लिहिलेले असतात. पहाटे बारक्या आला. न बोलताच झोपला. ताईंनी एका शब्दानी त्याला काही विचारलं नाही.

 पुढचे काही दिवस तो जरा व्यवस्थित वागला. अभ्यास करू लागला. पण मित्र कुठे बसू देतात. दर पाच मिनिटाला शिट्टी. लगेच हातातलं काम सोडून हा दरवाजाबाहेर. जर घरी पायच ठरला नाही, तर अभ्यास काय करणार बोडक्याचा?

 जरा वातावरण शांत झाल्यावर त्याला अर्धसत्य सांगितलं," मला खोकल्याचा आजार झाला होता. आठवतं का?" बारक्या टीव्हीवर