पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्याचा मुका परत "पण पोराला काही होणार नाही ना?" असं विचारून, "काळजी करू नका, नक्की काही होणार नाही," असे उत्तर ऐकून ताई निर्धास्तपणे घरी आल्या. बारक्या शाळेतून घरी आल्यावर पहिल्यांदा घेतला. बारक्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य. मग एकदम वैतागला, "ए सोडना..." दप्तर टाकून तसाच अंगणात गेला. ताईंनी पदरानी डोळे पुसले व तशाच त्याच्याकडे बघत दाराशी उभ्या राहिल्या.

 काउन्सिलरच्या सांगण्यावरून हॉस्पिटलात 'सीडी-फोर' नावाची रक्ताची चाचणी केली होती. त्याचा रिपोर्ट आला. तो ६५० होता. काउन्सिलरनी रिपोर्ट नीट समजावून सांगितला. म्हणाला, "दर सहा महिन्यांनी सीडी-फोरची चाचणी करायची. तो ३५०च्या खाली उतरला, की एचआयव्हीची औषधं सुरू करायला लागतील. पहिलं तुम्ही एआरटी सेंटर म्हणजे अँटेरेट्रोव्हायरल थेरपी सेंटरमध्ये तुमचं नाव नोंदवा. लवकरात लवकर नावनोंदणी करा. जर कोणता आजार झाला किंवा कोणताही त्रास झाला तर लगेच एआरटी सेंटरमध्ये येऊन डॉक्टरांना दाखवा. त्रास अंगावर काढू नका." "नाही काढणार" ताई पुटपुटल्या. "नावनोंदणीसाठी जाताना रेशनकार्डची झेरॉक्स, दोन फोटो आणा, एका ओळखीच्या व्यक्तीला बरोबर घेऊन जा." काउन्सिलर म्हणाला. ओळखीची व्यक्ती? कोणाला सांगणार? सम्याला? सम्याला ताईंनी सांगितल्यावर तो उलट ताईंवरच चवताळला होता. "xxxx तुझ्यामुळे मला झाला असायचा" असं म्हणून तणतणत गेला. त्याचा जीव घ्यावासा वाटत होता. मोठमोठ्यानी ओरडून हा कसा दुटप्पी आहे, हे सगळ्या गावाला ओरडून सांगावंसं वाटत होतं, पण सगळा राग गिळून गप्प बसल्या होत्या. कोणाला सांगणार? शेजारणीला? नको नको, ती गावभर करेल. निमीला? बघू नंतर, असा विचार करत ताई बाहेर पडल्या आणि नावनोंदणी करायचं पूर्ण विसरल्या. पण मनात विचार आला होता- कोणाला सांगावं? कोणावर एवढा विश्वास ठेवावा?

●●●