पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जीव आला. काउन्सिलर पुढे म्हणाला "तुम्हाला अजून एक मूल हवं असेल तर..... ..नाही नाही" म्हणत ताईंनी चटकन विषय बदलला व आहाराविषयी परत विचारलं. काउन्सिलर म्हणाला, "अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत ताई. पाणी उकळूनच प्या. जेवायच्या अगोदर हात साबणाने स्वच्छ धुवा. जेवण गरम करून खा. शिळं अन्न खाऊ नका, जर शिळं अन्न खायची वेळ आली तर चांगलं गरम करून मगच खा. सकस आहार घ्या. जेवणात गव्हाच्या पोळ्या, डाळ असू देत. जमल्यास पालेभाज्या, फळे, अधूनमधून नाचणीचे पदार्थ खा. गर्दीत फिरू नका. गर्दीत फिरल्याने हवेतून पसरणारे आजार होण्याची शक्यता वाढते, कुणाला टीबी झाला असेल तर त्याला टीबीची औषधं सुरू होऊन १५ दिवस होईपर्यंत त्याच्या संपर्कात येऊनका.

 जर सिगारेट/विडी, दारू घेत असाल तर ती पूर्णपणे सोडून देता आली तर उत्तम. कारण सिगारेट/विडी ओढल्याने फुफ्फुसाचे विकार लवकर होतात. दारू पिल्याने यकृताला सूज येते. पूर्णपणे सोडणं जमणार नसेल तर निदान यांचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करा. उदा., जर दिवसाला १० विड्या ओढत असाल तर ६ महिन्यात त्या अर्ध्यावर म्हणजे ५वर आणण्याचा प्रयत्न करा. जर दारू पित असाल तर ती हळूहळू कमी करायचा प्रयत्न करा. दररोज अर्धी क्वॉर्टर दारू घेत असाल तर ६ महिन्यात पाव क्वॉर्टरवर भागवण्याचा प्रयत्न करा. आणि ताई अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आता चुकूनही बिगर निरोधचा संबंध कुणाबरोबर करू नका." ताईंनी मान खाली घातली.

एचआयव्ही संसर्गित स्त्री व मातृत्व

 प्रत्येकगर्भवती स्त्रीने एचआयव्हीची चाचणी करून घ्यावी. जर स्त्री एचआयव्ही संसर्गित असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य वेळी, योग्य औषध घेऊन बाळाला एचआयव्हीचा संसर्ग होणे . टाळता येते.