पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९९ विनंति उपरी येथील कुशल ता० भाद्रपद शुद्ध एकादशी मुक्काम मौजे गणेगांव प्रांत कर्डे ये स्थळीं सर्व मंडळी आपले आशीर्वादें स्वस्तिक्षेम जाणून स्वकीय कुशल लेखन आज्ञा केली पाहिजे. विशेष, बहुत दिवस झाले, स्वामींकडील आशीर्वाद पत्र येऊन साकल्य कळूं येत नाहीं. येणेंकडोन चित्तास उत्कंठा प्राप्त झाली आहे ते श्री जाणे ! याउपरी स्मरणपूर्वक आशीर्वादपत्र आपला संतोष लिहून सदैव आनंदवीत गेलें पाहिजे. तेणेंकडोन आल्हाद होईल. यावरी आमचें वर्तमान तरी स्वामी गणेगांवीं आले ते समयीं भेटी घेऊन ख़ारीस गेलों ते वेळेस माळवा प्रांतीं छावणी झाली. त्याज येलीकडे यंदा मकसुदा (बाद) प्रांतींची मोहिम होऊन समग्र लष्करासहवर्तमान त्रिस्थळीं यात्रा जाली. हें वर्तमान तों परस्पर स्वामींस श्रुत जालेंच असेल. यावरी प्रस्तुत आपले आशीर्वादें श्रावण वद्य प्रतिपदेस गांवास आलों. स्वामींस कळावें. यानंतर आपण येथें भेटीस आले होते (ते) वेळेस आह्मांस बसावयास घोडी कुमेत एक चोखट होते, ते गतवर्षी माळव्यांत छावणी झाली ते समयीं मेली. या उपरी घोड़ें आझांस बसावयायोग्य नाहीं तरी कृपा करून आह्मांस बसावयासी घोडा निळा पाठविला पाहिजे. येविशीं आपण द्यावासा पूर्वीच मान्य केले आहे. त्यामध्ये सांप्रत बसावयायोग्य घोडें नाहीं. तरी याउपरी कृपा करून घोडा बसावयासी अगत्यरूप पाठविला पाहिजे. येविशीं विस्तारें ल्याहावें तरी देणें सर्वस्व स्वामींचे आशीर्वादाचेंच आहे. ऐसें जाणून अनमान न करितां अगत्यरूप घोडा पाठविला पाहिजे. वरकड वर्तमान आपले आशीर्वादें कुशल असे सदैव पत्रीं परामृश करीत गेलें पाहिजे. बहुत काय लिहिणें, लोभाची वृद्धि करावी ही विनंति. ●