पान:श्री दादा नाईक जीवन दर्शन.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संकेश्वरच्या जगद्गुरुंच्या परिसरात ज्ञानदानाचे कार्य करणारा हा एक प्रामाणिक उपगुरुच होता. संकेश्वर हायस्कूलचे संवर्धक म्हणून मी त्यांना पाहिले आहे. शिक्षक व प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांचे मानाचे स्थान आहे पण हसतमुख व स्नेहाच्या सहवासात उमलणारा व उमलविणारा हा खरा मित्र आहे. 'समानशीले व्यसनेषु सख्यम्' ही उक्ती आमच्या मैत्रीला लागू पडते. दोघांतही जीवनाला सामोरे जाण्याची जिद्द आहे. जगण्यात आनंद मानण्यात यावा लोकांचे भले व्हावे, ही तीव्र इच्छा आहे. जग सुसूत्र आहे. ही धारणा आहे. या वृत्तीला मधु-विद्या म्हणतात. ( ती आमच्या रोमारोमांत भिनली आहे, हे आमचे शील आहे आणि दोघांना व्यसनही एकच आहे, या सगळ्यांच्या पाठीमागे काय आहे? हे पाहण्यासाठी ते परा-विद्येची कास धरु पाहतात. परा-विद्येत मंत्र आले, विधी, ज्योतिष शास्त्र तत्सम आणि त्याच सारख्या आणखी कितीतरी अनेक गोष्टी आल्या. माझा यात प्रवेशही नाही अथवा रसही नाही. अपरा-विद्येने म्हणजे भौतिक ज्ञानाच्या माध्यमातूनच मी अज्ञात समस्यांचा मागोवा घेतो. माझे उपनिषदे व ऋग्वेद या मधूनच संशोधन चालू आहे. आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा खूप चर्चा होते काही गोष्टींवर प्रकाश पडतो, विचारांना चालना मिळते आणि मुख्य म्हणजे प्रत्येक भेटीतून जास्तच आनंद मिळतो. या व्यसनामुळे आमची मैत्री उत्तरोत्तर दृढ झाली आहे. डि.एस. हे कल्याण मार्गाचे पथिक आहेत. त्यांची वाटचाल अविरत आहे. मी माझ्या स्वार्थासाठी का होईना पण त्यांना पूर्ण शंभर वर्षाचे आयुष्य इच्छितो. हे आयुष्य धडधाकट बुद्धीचे व निरोगी असावे शिवाय त्यातून अध्यात्माचा स्त्रोत जिवंत सारखा असावा अशी माझी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. आम्ही आता थोडेच मित्र उरलो आहोत. नदीकाठच्या वटवृक्षासारखे. माझ्या वीस-एक मित्रांपैकी आता फक्त जिव्हाळ्याचे म्हणून पाच-सातच आहेत. निसर्गामुळे उन्मळून पडलेले वटवृक्ष मी पाहतो आहे परंतु आम्हा दोघांनाही एक समाधान आहे ते हे की आमच्या पारंब्या काठच्या जमिनीत खूप खोलवर गेल्या आहेत त्यातून नवीन वटवृक्ष वर येत आहेत. काही मातृ व पितृ वृक्षापेक्षा जास्त सरस व सतेज आहेत. हीच आमच्या आयुष्याची इति कर्तव्यता. हाच आमचा आनंद आणि हेच आमचे व्यसन. दादा नाईक जीवन दर्शन