पान:श्री दादा नाईक जीवन दर्शन.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझे अनधिकृत गुरु मा. ना. कुलकर्णी श्री. धोंडोपंतांचा परिचय १९३८ मध्ये कै. ती. मामांनी काही काळ संकेश्वरला बिहऱ्हाड केले होते त्यावेळी झाला. वयाने ते वडील होतेच शिवाय एका शाळेत ते मुख्याध्यापकही होते. मी त्यावेळी मुंबईला महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्गात शिकत होतो. त्यांची ऊठबस कै. ती. मामांच्या समवयस्क मंडळींत असे आणि मी सुट्टीत थोड्या दिवसासाठीच आलो होतो. यामुळे त्यावेळचा त्यांचा परिचय केवळ तोंडओळखीचाच होता. काहीं निमित्ताने एकदा माझे स्नेही श्री दादासाहेब गळतगेकर आमच्याकडे आले असताना त्यांचा आणि डोपंतांचा संगीत विषयावर वादविवाद झाला होता. मी त्यात प्रत्यक्ष भाग घेतला नाही पण तो ऐकून 'हे एक घमंडी गृहस्थ आहेत' असा श्री. धोंडोपंतांविषयी माझा ग्रह झाला. १९४० मध्ये पदवीधर झाल्यानंतर श्री. धोंडोपंतांच्या शाळेत शास्त्रशिक्षक म्हणून लागलो. शाळेचे सूत्रचालक कै. ती. डॉ. जोशी आम्हा दोघांनाही त्या शाळेत आणण्यास कारणीभूत आणि वडिलधारे म्हणून आदरणीय होते. वर उल्लेखलेल्या पूर्वग्रहामुळे आमचे परस्परांशी कितपत जमेल ही शंकाच होती. त्यावेळी मलाही माझ्या वाचनाची घमेंड होती. पण श्री. धोंडोपंतांचे स्वरूप माझ्या लक्षात येऊ लागले. त्यांचे वाचन आणि पाठांतर अफाट होते. इंग्रजी काव्यातीलच काय पण नाटकांतील आणि कादंबऱ्यातील उतारेच्या उतारे ते पाठ म्हणून दाखवत. त्यांच्या घरी गेलो असता अक्षरशः हात घालेल तेथे पुस्तके मिळायची आणि ती श्री. धोंडोपंतांनी सूक्ष्मपणे अभ्यासिलेली असायची. माझी घमेंड खाडकन् उतरली. त्यांचे इतर स्नेही आणि सहकारी वाङ्मयाच्या क्षेत्रात अगदीच अरसिक होते. त्यामुळे माझ्यासारख्या वाङ्मयाशी निदान तोंडओळख असणारा श्रोता या दृष्टीने त्यांनाही माझ्याविषयी जिव्हाळा वाटू लागला पुढे त्यांनी मला हाताखालचा शिक्षक न मानता पाठचा भाऊ समजून हाताला धरून शिक्षणक्षेत्रातला श्रीगणेशा शिकविला. पुढची अडीच वर्षे मी अगदी सावलीसारखा त्यांच्या सहवासात राहिलो आणि त्या अवधीत काठीने धोपटून पाहण्याचा प्रयत्नही न करता या गोरा कुंभाराने माझे मडके घडविले आणि ताप लागू न देता भाजून पक्के केले. ही अडीच वर्षे गुरुसेवेची नसली तरी गुरुसहवासातील तपश्चर्या या स्वरूपाची माझ्या जीवनात झाली. १९४२ च्या चळवळीत भाग घेतल्याने मी वर्षभर शिक्षण क्षेत्रातून बाहेर होतो पण कारावासातून परतल्यावर पुनः शिक्षण क्षेत्रात सोलापूरला जाण्याचा माझा विचार आहे असे कळताच श्री. धोंडोपंत अक्षरशः धावत आमच्या गावी आले आणि पुनः संकेश्वरास घेऊन गेले. यानंतर श्री. धोंडोपंत स्वतः शिक्षण क्षेत्रातून निवृत्त होण्याच्या दृष्टीने आटपाआटपी करू लागले होते. त्यावेळच्या एका प्रसंगाने मला त्यांचे जे दर्शन झाले दादा नाईक : जीवन दर्शन ४