पान:श्री दादा नाईक जीवन दर्शन.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझे वर्गमित्र प्राचार्य एम. आर. देसाई श्री. नाईक यांची व माझी मैत्री साठ वर्षाचे तूप झाले आहे. त्याला सुवास आहे, स्वाद आहे आणि झालेली जखम बरी करण्याचे सामर्थ्यही त्याला प्राप्त झाले आहे. हे घृत अत्यंत गुणकारी आहे. २ आम्ही हल्ली वर्षातून अनेक वेळा भेटतो, बोलतो व चर्चाही करतो. बरे वाटते; तेंव्हा आणि नंतरही. मन उल्हासित होते आणि मी कामाला जोमाने लागतो. एक जुनी आठवण- मी राजाराम कॉलेजमध्ये ज्युनिअर मध्ये शिकत होतो, ते दिवस ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर चळवळीचे होते. त्यावेळी कॉलेजच्या स्नेहसंमेलनासाठी एक मान्यवर पाहुणे आमंत्रिले होते. ते गृहस्थ ब्राह्मण होते. त्यांनी पूर्वी शाहू महाराजांच्यावर अनेक वेळा कटू टीका केली होती. ते पाहुणे म्हणून येतात म्हणून ब्राह्मणेत्तर विद्यार्थी क्षुब्ध झाले होते. पाहुणा बदलण्याची विनंती प्राचार्यांनी फेटाळली. पाहुणे आणण्यास दरबारचे सर्व लोक अनुकूल होते. तर जनता व बहुजन समाजाचा विरोध होता. त्याला विरोध करण्याचे ठरवून त्या पाहुण्यावरचा राग आम्ही व्यक्त केला. उघड विरोधक म्हणून मी जाहीर झालो. हे १९३२ साली असावे. त्यावेळी माझ्यावर जवळ जवळ सर्व ब्राह्मण मित्रांनी बहिष्कार घातला, अपवाद फक्त दोनच. एक अमृतराव घाटगे व दुसरे डी. एस. नाईक. दोघेही अत्यंत हुषार व दिलदार वृत्तीचे, सामाजिक मतभेदांमुळे मैत्रीत त्यांनी कधीही बिघाड आणू दिला नाही. मला डी. एस. यांच्या विषयी आदर आहे कारण त्यांचे वाचन खोल, चिकित्सक व अनेक अंगाचे शिवाय आपणाला जे आवडते ते सर्वाना मिळावे व त्याची गोडी सर्व मित्रांनी घ्यावी म्हणून त्यांचे जिव्हाळ्याचे विवेचन सतत चालू असे. मुक्त व विनामूल्य ज्ञानाचा प्रसार हाच त्यांच्या आनंदाचा बहर ते विद्यार्थी असतांना खुल्या दिलाचे व मोकळ्या मनाचे चालते फिरते प्राध्यापक म्हणून ओळखले जात. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजपासून ते बिंदू चौकापर्यंत ते कॉलेज सुटल्यानंतर एक तासभरतरी असायचे. सोबत पंधरा-वीस विद्यार्थ्यांचा घोळका. त्या कोंडीत ते दिसायचे मुक्त विद्येचा आनंद ते फैलावत व इतरांनाही सहभागी करत. त्यांच्या वसतिगृहापासून त्यांना जाण्यास पंधरा ते वीस मिनिटे अवधी लागे परंतु त्याना तो पार करण्यास एक तासाहून अधिक अवधी लागे. दादा नाईक : जीवन दर्शन M