पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जय निश्चित, काळ अनिश्चित मुद्दा होय. जो तो आपल्या बाजूला अधिक सैन्य आणि जादा रणसाहित्य ओहूं पाहणार आणि त्या बाबतीत एकमत होणें कठीण आहे. कारण कोठलीहि एक बाजू कमकुवत झाल्यास दोस्तांची तिसऱ्या आघाडीची झडप नेमकी त्या बाजूवरच पडावयाची. या अडचणींतून मार्ग काढून जर्मन सरसेनापति फ्रान्स, इटाली व बाल्कन्स या तीनहि बाजूंचा बचाव कसा करू शकतील हा प्रश्नच आहे; आणि म्हणूनच दोस्तांचा जय निश्चित आहे. तथापि या सगळ्या घडामोडी दोस्तांना अनुकूल अशा घडून येण्याला कालावधि किती लागेल तें मात्र अनिश्चित आहे. रशिया वाट पाहात राहील रशियानें सेबास्टोपोल घेऊन आपल्या पराक्रमाचा उच्चांक गांठला. त्या वेळे- पासून त्या आघाडीकडची हालचाल मंदावली आहे. तथापि रशिया कांहीं एवढ्यानें थकून किंवा समाधानाची ढेकर देऊन स्वस्त बसणारा नाहीं. मात्र त्याला नव्या चढाईची पक्की तयारी करण्याला कांहीं फुरसद हवी. पण त्याशिवाय खरी महत्त्वाची बाब म्हणजे आतां यापुढे दोस्तांच्या तिसऱ्या आघाडीची सुरुवात होण्याची तो वाट पाहात राहणार. आजपर्यंत रशियानें एकट्यानेंच जर्मनीशी सामना करून अतोनात नुकसान सोसलें; पण तो रशियाचा जगण्यामरण्याचा व मानापमानाचा प्रश्न होता. रशियाचा सुपीक, समृद्ध आणि औद्योगिक केंद्रे असलेला प्रांतच जर्मनीनें प्रत्यक्ष बळकाविला असल्यामुळे दोस्तांच्या चढाईची वाट न पाहतांच रशियाला तो सोडविणे आवश्यक वाटले. परंतु यापुढची चढाई पोलंड, झेकोस्लोव्हाकिया आणि बाल्कन्स या परराष्ट्रांतून व्हावयाची आहे. ही चढाई यशस्वी करण्यासाठी रशियनांना हजारों वीरांचा बळी द्यावा लागेल; पण अखेरीस तो मुलख कोणाच्या अधिराज्याखाली राहणार हा प्रश्नच आहे. पोलंड आपला स्वतःचा मुलूख रशियाला देऊन त्याच्या मोबदला जर्मनींतला मुलुख घेऊन बसण्याला खुषी नाहीं, असें आतां चर्चिल यांनी पार्लमेंटांत उघडपणें सांगून टाकलें. बाल्कन्स संबंधांत तशी वाच्यता झाली नसली तरी तोहि प्रश्न तितकाच भानगडीचा असणार. अर्थातच भावी राजकीय धोरणाविषयीं एकवाक्यता झाल्याशिवाय आणि दोस्त राष्ट्रांनींहि तिसरी आघाडी उघडून बाल्कन प्रांतांना पश्चिम बाजूनें शह दिल्याशिवाय रशिया पूर्वेकडून बाल्कन्सवर चालून येण्याची घाई करणार नाही. बाल्कन्सवर स्वारी करण्यापेक्षां फ्रान्सच्या किनाऱ्यावर सैन्य उतर- विणेंच दोस्तांना इष्ट वाटल्यास रशिया आपली चढाई कायमची स्थगित करील असें नाहीं. त्याची स्वतःची पूर्ण तयारी होतांच तो जर्मनीवर पूर्वेकडून हल्ला चढवील; पण मग युरोपच्या पूर्वभागांतील राजकारणांत तो ब्रिटिशांना ढवळाढवळ करूं देणार नाहीं. अशा रीतीने हा प्रश्न गुंतागुंतीचा असल्यामुळे या चढाईची नक्की वेळ आतांच अंदाजतां येत नाही आणि म्हणूनच दोस्तांचा जय निश्चित असला तरी त्याची वेळ तूर्त तरी अनिश्चितच आहे.