पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध टूलोन बंदरांतल्या फ्रेंचांच्या आरमाराचें पुढे काय झाले ते मात्र नकी कळले नाही. ते आरमार दोस्तांच्या हाती पडणार कां जर्मनीला मिळणार याच्यावर भूमध्य समुद्रांतील लढाईतले यशापयश पुष्कळ अंशी अवलंबून राहील याकरितां फ्रेंच आरमार आपल्या हाती घेण्यासाठी उभयतांचे डावपेंच चालू आहेत. स्वतः फ्रेंच सरकारचें म्हणणे असे आहे की, आमचें रक्षण आम्ही करूं, त्या भानगडींत इत- रांनी पडूं नये; परंतु दुर्बळांच्या असल्या तक्रारीला कोण जुमानणार ! घाव जर्मनीच्या वर्मी झोंबला आफ्रिकेच्या किनाऱ्यावर सैन्य उतरविण्याचे कार्य दोस्त राष्ट्रांनी मोठ्या धाडसानें पार पाडले यांतहि शंका नाहीं. हें सैन्य वाहून आणणाऱ्या जहाजां- बरोबर एवढा कडक आरमारी बंदोबस्त होता की, जर्मन पाणबुड्या कोठेंच धोका उत्पन्न करूं शकल्या नाहीत. दोस्त राष्ट्रांचें वैमानिक दलहि आतां चांगलेच प्रबळ झाले असल्याने जर्मन हवाईदलाकडूनहि या जहाजांना उपसर्ग पोंचू शकला नाहीं. यावरून अमेरिकेला वाटेल तितकें सैन्य वाटेल त्या वेळी आफ्रिकेत उतर- वितां येईल असा विश्वास उत्पन्न झाला असून त्याच प्रकरणांत जर्मनांचा धीर खचला असावा असे दिसतें. नुकतेंच हिटलरचें जें भाषण झाले त्या भाषणांतला त्याचा नूर या नव्या घडामोडींमुळे अगदींच पालटलेला दिसत होता. त्या भाषणांत चढाईची धमकी व्यक्त न होतां ' मी केव्हांहि शरण जाणार नाहीं' अशी निर्वाणीची भाषा होती. यावरूनच दोस्त राष्ट्रांचा हा घाव जर्मनीला वर्मी झोंबला असावा असे उघड दिसतें. स्पेनचा तटस्थपणा दोस्त राष्ट्रांनी भूमध्य समुद्रांतून इटालीवर व फ्रान्सवर स्वारी करावयाची म्हटल्यास स्पेनचीहि अनुकूलता असणें अवश्य आहे. मात्र दोस्त राष्ट्रांना स्पेनची मदत मिळणें संभवनीय दिसत नाहीं व तशी आशाहि दोस्त राष्ट्र बाळगीत नसतील. स्पेन तटस्थ राहिला तरी पुरें एवढीच दोस्तांची अपेक्षा दिसते; पण तेवढी तरी यथार्थ ठरेल का नाहीं याविषयीं निश्चितपणे कांहीं सांगतां येत नाहीं. स्पेन जर गट्टी राष्ट्रांना मिळाला तर दोस्त राष्ट्रांनी दिलेला सध्यांचा शह अपुरा पडेल आणि दोस्तांना इटालीच्या किनाऱ्यावर उतरून गट्टी राष्ट्रांना तंबी देणें कठीण पडेल. उलटपक्षी जर्मनी व इटाली यांना स्पेनच्या किना-याचा उपयोग करतां आल्यास आफ्रिकन किनाऱ्यावर अमेरिकेचें कितीहि मोठें सैन्य उतरलें तरी तें फारसें प्रभावी होऊ शकणार नाहीं. स्पेनवर व स्पेनच्या आफ्रिकेंतील वसाहतीवर आपण चाल करणार नाहीं असे आश्वासन दोस्त राष्ट्रांनी स्पेनला दिले आहे. या आश्वासनावरूनच स्पेन आपल्याला मिळेल असें दोस्तांना वाटत नसावें असें अनुमान निघते. कारण स्पेननें गट्टी राष्ट्रांना जाऊन मिळू नये