पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सिंगापूर पडले; आतां तरी कर्तव्य-मार्गाला लागा ३७ कारणानें हिंदुस्थानबरोबरच ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांनाहि धोका निर्माण झाला असल्याचें तिकडील जनतेला वाटत आहे. ब्रह्मदेशावर आक्रमण करून, रंगूनवर भयंकर बाँबहल्ले करून, व हिंदी महासागरांत एक-दोन बोटी बुड- वून हिंदुस्थानाविषयींचें आपले आक्रमणाचें धोरण काय आहे ते जपाननें अगाऊ दिगर्शित केलें आहेच. एवढी गोष्ट निश्चित की, पॅसिफिक महासागरांतील ब्रिटिशांचा व्यापार आणि ब्रिटिशांचा राज्यविस्तार कांहीं कालपर्यंत तरी •संपुष्टांत आला असून हिंदुस्थानच्या सरहद्दीपर्यंत जपानी युद्धाच्या ज्वाला प्रसृत होणार. जपानच्या हिंदुस्थानवरील आक्रमणाला बहुतकरून अंदमानपासून सुरुवात होईल, आणि सीलोन व मादागास्कर रोखन हिंदुस्थानची कोंडी करण्यांत येईल, असा तज्ज्ञांचा तर्क आहे. जपानच्या या युद्धप्रगतीबरोबर हिवाळ्यानंतर जर्मनी काय करणार याचा विचार केला, तर त्याची रशिया व ईजिप्त या रण- क्षेत्रांवर जोराची धडकी बसेल आणि त्या धडकीचा परिणामहि सिंध व वायव्य- सरहद्दप्रांत या बाजूच्या हिंदभूमीला भोगावा लागेल अशी धास्ती वाटते. चिंता व भीति यांचें साम्राज्य हे कसकसे होईल ते पुढें दिसेलच. तूर्त जपानी युद्ध एका बाजूनें हिंदुस्थानच्या अंगाशी येऊन चिकटले आहे यांत संशय नाहीं. सिंगापूर घेण्यापूर्वीच मार्ताबान, मौलमीन, रंगून या ठिकाणी जे वैमानिक जपानी हल्ले चालू होते व ज्या हल्लयांत कित्येक ब्रह्मी व हिंदी लोक मृत्युमुखी पडले, त्याचा परिणाम नजीकच्या कलकत्ता, डाक्का या शहरांवर व भागावरच नव्हे, तर मुंबई, पुणे, मद्रास या दूरच्या स्थळींहि थोडथोडा दिसूं लागला होता. जपाननें ब्रह्मदेशावर स्वारी केल्यापासून तर कलकत्त्याहून सहा लक्ष लोक शहर सोडून रेल्वेने बाहेरगांवीं -गेले, असे रेल्वे खात्यानेंच प्रसिद्ध केले आहे. हा सर्व प्रकार सिंगापूर पडण्यापूर्वीच झाला; मग आतां तर काय विचारावयासच नको. संक्षेपानें लिहा- वयाचें म्हणजे जनतेच्या मनाची अतिशय चलबिचल झाली आहे व सामाजिक स्थैर्याचा कांटा ढळला आहे. शहरे सोडून खेडेगांवांत जाऊन राहावें, जिंदगीची कांहीं तरी व्यवस्था करावी, मुलांबाळांस व स्त्रियांस सुरक्षित स्थळी पोंचवावें, असे विचार जनतेंत बरेच रूढ होऊं लागले आहेत. एकंदरीनें चिंता व भीति यांचं साम्राज्य जनतेच्या मनांत दृढमूल होत आहे, असे स्पष्ट दिसतें. सरकारच्या शंभर चुका प्रस्तुतच्या भीतिप्रद परिस्थितीचा सरकारनें नीट परामर्श घेण्याची वेळ आतां आली आहे. जर्मन युद्धास तोंड देण्याची सिद्धता जी काय करावयाची असेल ती सरकार करील. त्या बाबतीत सरकारने शंभर चुका आतांपर्यंत केल्या आहेत व अजूनहि करीत आहे. दूरदर्शी ब्रिटिश मुत्सद्दी, विचारवंत