पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इटालीनं आगीत तेल ओतलें याची पूर्ण जाणीव इटालीला होती. जर्मनीनें पोलंडपासून हॉलंडपर्यंतच्या अनेक देशांवर झडप घातली तरी दोस्त राष्ट्रांना प्रत्यक्ष जर्मनीवर चाल करून जाण्याला मोकळा रस्ता मिळण्यासारखा नव्हता आणि इटाली तटस्थ राहिल्यानें जर्मनीच्या भोंवतालची कोंडी पूर्ण होऊं शकत नव्हती, हा एक प्रकारें जर्मनीला मोठा फाय- दाच होता. यामुळे इटालीला युद्धांत ओढण्याचा दुराग्रह जर्मनी धरणार नाहीं असें वाटत होते. त्याचप्रमाणे नॉर्वे, डेन्मार्क, हॉलंड या देशांवर जर्मनीनें झडप घातली तरी दोस्तांच्या प्रलक्ष हल्ल्यापासून जर्मनी सुरक्षितच राहिला असल्यामुळे ती सुरक्षितता सोडून दोस्तांना प्रत्यक्ष अंगावर घेण्याचे धाडस जर्मनी करणार नाहीं, अर्थातच बेल्जमवर जर्मनी स्वारी करणार नाहीं, असाहि तर्क होता. पण जर्मनीने बेल्जमवर स्वारी करून दोस्तांशी उघड्या रणांगणांत झुंज सुरू करण्याचे धाडस तर केलेंच. पण आतां इटालीलाहि युद्धांत ओढून आपली बाजू दोस्त राष्ट्रांच्या मान्याला मोकळी करून देण्याचा धाडसी अतिरेकहि केला असें सकृद्दर्शनी दिसतें. हे खरे असल्यास अशा रीतीनें महायुद्धाचा डोंबाळा अधिकाधिक पेटविण्याला जर्मनी कां प्रवृत्त झाला हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. साहसे श्रीः प्रतिवसति ज्याचा आपल्या राष्ट्राच्या पराक्रमी शक्तीवर पूर्ण भरवंसा नाहीं व ज्याच्या अंगांत खुमखुमी नाही, त्याला केवळ बचावाचे धोरण इष्ट वाटतें; एवढेच नव्हे तर, श्रेयस्करहि असते. परंतु जर्मनीचा आत्मविश्वास दांडगा आणि त्यापेक्षां त्याच्या रंगेलपणाचा अतिरेक झालेला. यामुळे नुसता बचाव करीत बसून लढाईचा डाव कुचंबत ठेवणें जर्मनीला पटले नसावें. शिवाय असा डाव कुचंबत ठेवल्यास दोस्त राष्ट्रांना तेवढे सगळे जग उलाढाली करण्यास मोकळे सांपडणार आणि जर्मनी तेवढा पिंजऱ्यात अडकल्याप्रमाणे होऊन राहणार, याचा नैतिक परिणाम जर्मन राष्ट्रावर अनिष्ट होईल आणि अखेरीस अशा कुचंबणेला कंटाळून नामुष्की पत्करूनहि तह करावा लागेल अशी जर्मनीला धास्ती वाटली असावी. एकीकडे कुचंबणा व तिचे आनुषंगिक अनिष्ट परिणाम आणि दुसरीकडे धाडस केलें व तें अंगलट आले तर समूळ नाश होण्याची शक्यता या दोहोंतून कोणतें संकट पत्करावें याचा काथ्याकूट होऊन जर्मनीनें बचावाचा पण कुचंबणेचा मार्ग त्याज्य ठरवून चढाईचा व साहसाचा खडतर मार्ग उघड्या डोळ्यांनी पत्करला. बेल्जममध्ये घुसून बेल्जम, इंग्लंड, फ्रान्स अशा तीन लढवय्या राष्ट्रांच्या अपरंपार सैन्याला उघड आव्हान देणे हे अत्यंत साहसाचें आणि पराकाष्ठेच्या धोक्याचें काम होते. परंतु 'साहसे श्रीः प्रतिवसति' हे ब्रीद्रवाक्य डोळ्यापुढे ठेवून राष्ट्राचा प्राण पणाला लावून जर्मनीनें आगत उडी घेतली. आणि आश्रर्याची गोष्ट ही की, बेल्जममध्ये तीन राष्ट्रांच्या सैन्याशी झुंजून एका राष्ट्राला शरण यावयाला लावून