पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केसरी पत्राचें ध्येय, धोरण व बीद २७१ शिड्याच अधिक उपयोगी पडतील आणि त्या शिड्यांवरून तटावर चढून गेल्यावर घरांत घुसणें व संगिनीचा मारा करणें हेंच साधन योग्य ठरेल. अशीं साधनें बद- ललीं म्हणून किल्ला घ्यावयास निघालेल्या सेनानीनें आपला बेत बदलला, किल्ला घेण्याचें ध्येय टाकलें, तो शत्रूशी लगट करूं लागला, त्याच्या आंगचें पूर्वीचें धाडस गेलें वगैरे सर्व कल्पना चुकीच्या व बाष्कळ होत. केसरीविरुद्ध कित्येकांचे कित्येक वेळा जे आक्षेप ऐकू येतात, तेहि याच कोटींतील होत. आम्हांला स्वराज्य नको, आम्ही स्वराज्यप्राप्तीचा उद्योग सोडून दिला, अथवा स्वराज्यासाठी आम्ही यापुढे कोणताहि त्याग करणार नाहीं असे धोरण ज्या वेळेला केसरी जाहीर करील, त्या वेळींच आक्षेपकांनीं शिव्या देण्याला तोंड उघडावें. तत्पूर्वीची त्यांची सगळी बडबड त्यांच्याच अज्ञानाची दर्शक होय. प्रतिपक्षी एकच पण सहायक वेगळे म्हणून लढ्याचें स्वरूप वेगळें हिंदी स्वातंत्र्याकरितां झगडावयाचें तें ब्रिटिश सरकाराशींच, हे निश्चित असल्यानें प्रतिपक्षी एकच ठरला. पण तो प्रतिपक्षी असा वस्ताद आहे कीं, तो नेहमी कोणा तरी सहायकाला हातीं धरतो आणि त्याला लढावयाला लावून आपण नामानिराळा राहतो. त्यामुळे स्वातंत्र्याच्या लढ्याचें स्वरूप नेहमीं बदलत असतें. हें मर्म ज्याला कळत नाहीं त्याचा गैरसमज होतो. हिंदी स्वातंत्र्याच्या लढ्यांत ब्रिटिश सरकारनें काय काय हिकमती केल्या पाहा. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची भाषा सुरू होतांच व त्याकरितां काँग्रेससारखी राजकीय संस्था स्थापन होतांच हिंदी लोकांत धर्मभोळेपणा आहे, त्यांच्या चालीरीति रानटी आहेत, ते स्त्रियांना क्रूरपणाने वागवितात, त्यांच्या सामाजिक चालीरीति आचरटपणाच्या आहेत, त्यांच्यांत शिक्षणप्रसार अत्यल्प आहे इत्यादि अनेक बयादि सांगून तुम्ही या सगळ्या गोष्टींत सुधारणा कराल तरच तुम्हांस स्वराज्य मिळेल आणि या सुधारणा केल्याशिवाय तुमच्या अंगीं स्वराज्य चालविण्याची पात्रता येणार नाही, असे प्रतिपादन करण्यास सुरुवात करून बुद्धिभेद करण्याला प्रारंभ केला. त्याबरोबर आमच्यांतल्याच चांगल्या शाहाण्या- सुरत्या लोकांवरहि ती मात्रा लागू पडली आणि ते लागले सामाजिक सुधारणेच्या नादी ! आणि इंग्लिश सरकार निश्चित म्हणूं लागले की, आतां पन्नास वर्षे तरी कटकट मिटली. पण लोकमान्य टिळकांनी तो डाव ओळखला आणि या हुलका- वणीनें फसून न जातां राजकीय हक्कांची मागणी आधीं निग्रहानें करा असा आग्रह त्यांनी चालविला. आधी सामाजिक का आधीं राजकीय या वादाचें बीज वर दिग्दर्शित केलेल्या बुद्धिभ्रंशांतच आहे. टिळकांना प्रगति व योग्य सुधारणा नको होत्या अर्से नाहीं; पण अमुक इतकी सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय स्वराज्याची