पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध मुळे अर्ज-विनंत्यादि सनदशीर मार्गावरचा आधींच उडत चाललेला जनतेचा विश्वास अधिकच उडत जाण्यास कारण घडत आहे. फांसावर टांगल्या जाणाऱ्या चौघां आरोपींचा जीव जगावा एवढ्या आशेनें देखील या नतद्रष्ट पाषाणहृदयी नोकरशाहीपुढे याचना करणें नको असें म्हणून कित्येकजण या दयेच्या याचनेच्या कार्यक्रमांत आधीच सामील झाले नव्हते. इतर कित्येकांनी असा विचार केला की, या सनदशीर चळवळीने जर चौघां मानवी प्राण्यांचे पंचप्राण वांचणार असतील तर व्यक्तिशः आपल्या व्रताचा भंग झाला तरी चालेल, पण हा शिष्टाईचा प्रयत्न करून पाहावा. पण आपली ही शिष्टाई इतक्या तुच्छतेनें फेटाळण्यांत आलेली पाहून त्यांच्याहि मनास केवढा जबरदस्त धक्का बसलेला असेल आणि नोकरशाहीच्या या उद्दाम प्रवृत्तीमुळे त्यांच्यांत केवढी प्रतिक्रिया सुरू होईल, याचा पोक्त विचार सर. कारने करावयास नको होता काय ? ज्या नोकरशाहीच्या राजवटीत एवढ्या बड्या बड्या शिष्टांनी भारतमंत्र्यापाशीं खर्च केलेल्या शब्दाची देखील अशी शोभा होते, आणि सगळे सनदशीर उपाय निष्फळ ठरतात, त्या नोकरशाहीविषयीं आबालवृद्ध स्त्री-पुरुषांच्या मनांत पूर्वीच्या दसपटीनें चीड उत्पन्न झाल्यास त्यांचा तो दोष मानतां येईल काय ? आणि ज्या जुलमी व बेजबाबदार राज्यपद्धतींत एखाद्या बेगुमान अधिकाऱ्याची खुनशी लहर ही अखिल जनतेच्या एकमुखी मागणीपेक्षां अधिक प्रभावी ठरते, तसली बेजबाबदार राज्यपद्धति बदलून तिच्या जागी जबाब- दार राज्यपद्धति प्रस्थापित करण्याची आवश्यकता तीव्रतेने जाणवू लागल्यास त्यांत तरी आश्चर्य काय ? बिनलगामी बेफाम तट्टू एवंच, हजारोंचं नव्हे तर लाखो लोकांची रीतसर मागणी बिनदिक्कत धुड- कावून लावून मुंबई सरकारने अखेरीस आपलाच हट्ट खरा केला, ही गोष्ट हिंदी राष्ट्राच्या मनास कायमची शल्यासारखी डाचत राहणार यांत शंका नाही. " म्हातारी मेल्याचें दुःख नाहीं पण काळ सोकावतो' म्हणतात त्याप्रमाणें चार माणसें मृत्युमुखी पडल्याचें दुःख नाहीं कारण एरवीं तरी लाठीनें, गोळी- बारानें तुरुंगांतील अन्नत्यागाने किंवा पोटावरून मोटार गेल्याने काळाच्या मुखांत हिंदी लोकांच्या आहुत्या पडतच आहेत; पण तेथें तो मृत्यु एक प्रकारें स्वतः आव्हान देऊन आपणावर ओढून घेतलेला असतो म्हणून त्याचें तितकेसें दुःख चाटत नाहीं. पण प्रस्तुतच्या प्रकरणांत या चौघां आरोपींना वाचविण्याचा शक्य तो सनदशीर प्रयत्न केला असतां, लोकमत अत्यंत दुर्बळ आहे आणि येथील नोकरशाही लोकमताला जबाबदार नाहीं, एवढ्याचमुळे हा सगळा प्रयत्न फुकट गेला ही गोष्ट मनाला डाचल्याशिवाय राहत नाहीं. आणि म्हणूनच अशा रीतीनें लोकमताला आपल्या टापांखाली बिनदिक्कत तुडवीत सैरावैरा धावणारें हें बिन