पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लिहिला, त्याच धोरणाने हा लेख मी लिहिला असल्यानें टिळकांच्या लेखांतील विचारसरणी तर या लेखांत कायम राखलीच, पण त्याशिवाय कांहीं मुद्द्यांचीं वाक्येंहि टिळकांच्या लेखांतूनच उद्धृत केली. अर्थातच दि. १९ जूनचा टिळकांचा लेख वाचून पाहिल्यावर या सादृश्याचा उलगडा होतो. दि. १९ चा व दि. २६ चा हे दोन्ही लेख टिळकांच्याच हातचे आहेत असे मानल्यास टिळकांनी आपल्या दुसऱ्या लेखांत पहिल्या लेखाचीच पुनरावृत्ति केली असें म्हणावे लागेल. परंतु या सादृश्यावरूनच दुसरा लेख टिळकांच्या लेखाचें अनुकरण करून दुसऱ्या कोणी लिहिला आहे, स्वतः टिळकांनी नव्हे, हें कोणाच्याहि सहज लक्षांत येईल. इतक्या कसोशीनें लेखांची निवड केली असून देखील, हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर जर कोणी त्यांतला एखादा लेख माझा नव्हे असे दाखवून देऊं शकला तर ती चुकी हेतुपुरस्सर झाली नाहीं, एवढे सांगून 'क्षमस्व' म्हणणे एवढा एकच त्यावर प्रायश्चित्ताचा उपाय व तसें प्रायश्चित्त घेण्यास मी केव्हांहि तयार आहे. लेखांची सूत्रबद्धता लेखांची निवड करतांना सकृद्दर्शनी उभ्या राहणाऱ्या मुख्य अडचणींचा हा विचार झाला. त्यानंतरचा प्रश्न असा की, या ग्रंथांत घेतले हेच लेख कां निवडले, दुसरे कांहीं लेख याहून सरस होते, ते कां निवडले नाहींत ? या संबंधांत ' भिन्नरुचिहि लोकः' हे एक उत्तर आहेच; पण त्याशिवाय दुसरं कारण असे कीं, लेखांची निवड करतांना कांहीं एक विशिष्ट धोरण स्वीकारणे अपरिहार्य होतें. १९१२ पासून १९४९ अखेरच्या ३८ वर्षांत शेंकडों लेख मजकडून लिहिले गेले. त्यांतून निवड करून छापावयाच्या लेखांची पृष्ठसंख्या ३२० च मर्यादित झालेली. अशा परिस्थितीत कोणता लेख घ्यावा, कोणता ठेवावा हे ठरवितांना लेखांत विषयांची विविधता राहून त्या त्या विषयाची थोडी तरी परिपूर्णता कशी सावेल इकडे लक्ष द्यावें लागलें. युरोपांतील महायुद्धासंबंधांतले कांहीं लेख देणें आवश्यकच होतें. या विषयावरचे १९ लेख या ग्रंथांत आले आहेत व त्यांनींच १०१ पृष्ठे व्यापली. आतां समजा कीं, यांतले १० च लेख घेतले असते व बाकीच्या ९ लेखांच्या जागी दुसऱ्या एखाद्या विषयावरील लेख समाविष्ट केले असते, तर लेखांची विविधता वाढली असती, पण त्याबरोबरच हें युद्धविषयक राजकारण अपुरेंच राहिलें असतें. ज्या वाचकांनी महायुद्धाच्या वेळचे लेख वाचले आहेत व ज्यांना त्या युद्धाचा आगापिच्छा नजरेसमोर आहे, त्यांचें तेवढ्या १० लेखांनी, किंबहुना ५ लेखांनी देखील समाधान होईल. परंतु या लेखांना ग्रंथनिविष्ट करतांना, ज्यांनी महायुद्धाचे लेख त्या त्या वेळीं वाचले नाहींत, अशा नव्या वाचकांचीहि सोय लक्षांत घेणें आवश्यक होतें. त्यांच्यापुढे जर एकदम 'महायुद्धाचा रंग पालटला ' किंवा 'काळ्या समुद्रांतील काळकूट' असा लेख एकदम ठेवला तर त्याचा त्यांना काय बोध होणार? याकरितां असे