पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध विलायतेंतून इकडे येण्याला निघेपर्यंत किंबहुना मद्रासच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवीपर्यंत, ड्यूकसाहेबांना आपण अंगीकारलेल्या शिष्टाईचा फोलपणा लक्षांत आला नसेल. हिंदुस्थानांत जेव्हां आकाशपाताळ एक करून सोडणारी चळवळ व्हावी तेव्हां कोठें विलायतेंत तिचा अतिसूक्ष्म प्रतिध्वनि ऐकूं येतो. अशा रीतीने तिकडील जनतेला अज्ञान स्थितीत ठेवण्यांत येते. यामुळेच डयूकसाहेबांची प्रथम दिशाभूल झाली असेल. त्यांना वाटले असेल की, हिंदी जनतेला स्वराज्याचा कांही बांटा पाहिजे आहे, व तो देण्याचा महत्त्वाचा समारंभ आपल्या हातून होणार. हा स्वराज्याचा वांटा हिंदी जनतेच्या मागणीहून थोडासा कमी असेल व तेवढ्यामुळे कांहीं मूठभर अधाशी लोक असंतुष्ट राहिले असतील; पण सामान्य जनता है अधिकारदान घेण्यास अत्यंत उत्सुक असेल आणि एवढा अधिकाराचा अंश दिला म्हणजे मागील सर्व दोषांचें परिमार्जन होईल. त्यांतून पंजाबांत कत्तल होऊन जो कांही प्राणघात झाला त्याच्याबद्दल होमाच्या शेवटी ज्याप्रमाणे 'माक्षिका केशकीट- पतंगायुपघातादि दोषपरिहारार्थ ' दोन आहुत्या टाकतात त्याप्रमाणे आपल्या मिट्टया भाषणाला गोड शब्दांचे दोन वळसे अधिक दिले म्हणजे काम भागेल. परंतु ता. १० जानेवारी रोजी मद्रासच्या बंदरावर उतरल्यापासून तो तहतकाल मुंबईच्या धक्कयावरून आगबोटीत चढेपर्यंत येथे त्यांनी जे कांही पाहिलें, ऐकलें व मनन केलें असेल त्यावरून त्यांच्या लक्षांत आले असेल की, या शिष्टाईची इमारत भलयाच पायावर रचण्याचा प्रयत्न झाल्यामुळे आपले परिश्रम निष्फळ झाले. सर्वत्र अमृतसरची छाया मद्रास शहरी त्यांच्या स्वागताचा जो फार्स झाला आणि त्याची सुधारून वाढावलेली आवृत्ति कलकत्ता शहरी निघाली. त्यावरून ड्युकसाहेबांनी ताडले की, हिंदी जनतेच्या काळजाला झालेली जखम बरीच खोल असून ती चिघळू लागली आहे. नुसत्या शाब्दिक सहानुभूतीच्या फुंकरानें ती जखम भरून येण्या- सारखी नाहीं. दिल्ली शहरांत पोंचल्यावर तेथील बहुजनसमाजाची मनःस्थिति व वर्तणूक पाहून तर त्यांची पुरतीच खात्री पटली असेल. पण त्यांच्याजवळ सहानु- भूतीच्या फुंकराशिवाय आणि 'माफ करा व विसरा' या कोरड्या निरोपाशिवाय जर दुसरी कांहीं जडीबुटी दिलेलीच नव्हती तर ते तरी बिचारे काय करणार ? शाब्दिक मंत्र प्रयोग करावयाचा तो त्यांनीं मनःपूर्वक करून पाहिला; परंतु त्या प्रयोगानें पंजाबच्या अत्याचाराची छाया कांहीं दूर होईना. मित्रसहराजाला ज्या- प्रमाणे जेथें तेथें ब्रह्महत्या पाठीशी उभी असल्याचा भास होई, किंवा संजयाला ज्याप्रमाणे पांडवाच्या प्रत्येक शब्दांत पांचाळीच्या मोकळ्या केशकलापाची जाणीव दृग्गोचर होई, तशी डयूकसाहेबांना सर्व हिंदुस्थानभर अमृतसरची छाया पडलेली दिसूं लागली आणि दिल्लीहून मुंबई इलाख्यांत आल्यानंतर तर त्यांच्या मनावर