पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनाच्या व्यग्रतेमुळे अनेकांच्या पुढील कामांत आणि श्रमांत व्यत्यय येतो, तो करंदी- करांच्या कामांत कधीच येत नाहीं. वृत्तपत्राचें काम हें नुसतें बौद्धिक काम नाहीं. तें सुव्यवस्थित होण्यासाठी कांहीं स्वयंसिद्ध व कांहीं कमावलेली अशी मनाची बैठक असावी लागते, तशी ती श्री. करंदीकर यांची पुष्कळ अंशीं स्वभावतःच झालेली आहे. मनुष्यजीवनांतील सर्व कामांप्रमाणे वृत्तपत्राच्या कामांतहि कांहीं साधतें आणि कांहीं फसतें. कितीहि साधार आणि सप्रमाण बाजू मांडली तरी लोकांचा आळस व प्रतिपक्षाचा वितंडवाद व हट्टाग्रह यांच्या योगानें न्याय्य फलप्राप्ति होत नाहीं. उदाहरणार्थ, पंचांगांचा वाद, शिवजन्मतिथीचा वाद, शिवाजी-राम- दास यांच्या भेटीसंबंधाचा वाद, किंवा कर्मयोग-संन्यासाचा गीतेवरील वाद घ्या. अशा अनेक वादांत कर्तव्यबुद्धीनें श्री. करंदीकर यांनी लेखणी चालविली आहे. अशा वेळीं " Though vanquished he argued still " या गोल्डस्मिथच्या वचनाप्रमाणे कित्येक वेळा विरोधकांचा हट्टाग्रह प्रत्ययास आलेला आहे. या बाब- तींत श्री. करंदीकर हे आपले कर्तव्य केल्यानंतर विरुद्ध पक्षाच्या आडमुठेपणा- बद्दल खंत करीत बसत नाहीत. संपादकीय कर्मयोग श्री. तात्यासाहेब करंदीकर यांच्या सर्वच आयुष्यक्रमाचा कालक्रमानुसार आढावा, म्हणजे चरित्र, सांगणें हें येथें प्रस्तुत नाहीं. त्यांच्या ठळक संपादकीय लेखांचा हा संग्रह वाचतांना त्या लेखांच्या मागे असलेली व्यक्ति ठळकपणें लोकांच्या • मनःचक्षं पुढें यावी यासाठी श्री. करंदीकरांच्या कर्मयोगी आयुष्यांतील लेखन-कर्म- योगाचें जें स्वरूप त्यांच्या सहवासांत काम करण्याची संधि मिळालेल्या लोकांना दिसतें तें थोडक्यांत मांडण्याचा प्रयत्न या प्रास्ताविक निवेदनांत केला आहे. सात्त्विक कर्त्याची कर्मयोगशास्त्रांत जी लक्षणे दिली आहेत ती विविध प्रकारच्या स्वकर्मानुसार आचरल्या जाणाऱ्या कर्मयोगामध्यें तत्त्वतः सारखींच असतात - मुक्तसंगोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः । सिद्धयसिद्धयोर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते ॥ ही लक्षणे संपादकीय कर्तव्याच्या संबंधांत श्री. करंदीकर यांनी कशीं सार्थ केली आहेत तें वरील त्रोटक दिग्दर्शनावरून समजून येईल. ही पार्श्वभूमि मनांत ठेवून या लेखसंग्रहांतील लेखांचें वाचन करणाऱ्याला त्यांतील स्वारस्य ध्यानांत येण्यास साहाय्य होईल अशी आशा आहे. } पुणे, दि. २५ जानेवारी १९५० ग. वि. केतकर सं. केसरी व मराठा