पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध असे म्हणतात. या समितीत इंग्लंड, अमेरिका, रशिया, फ्रान्स व चीन यांना काय- मचें प्रतिनिधित्व दिले असून, बाकीच्या राष्ट्रांचे सहा प्रतिनिधि आलटून-पालटून निवडले जाणार आहेत. मागील युद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्र- संघांत व या समितीत मूलभूत भेद आहेत. मागील राष्ट्रसंघांत सर्व लहान-मोठ्या राष्ट्रांना अधिकाराच्या दृष्टीनें बरोबरीचें स्थान होते आणि या समितीत श्रेष्ठ व सामर्थ्यवान् अशा पांच राष्ट्रांचाच कायमचा वरचष्मा ठेवला आहे. त्यांतहि बिचारा चीन केवळ अमेरिकेच्या कृपेनें तेथें आहे व फ्रान्सच्या राजकारणांतील छायाप्रकाश इतक्या द्रुतगतीनें बदलती की, फ्रान्स एका दृष्टीनें या समितीत कमकुवतच ठरतो. राहिलेल्या तीन राष्ट्रांत आज इंग्लंड सर्व दृष्टीनें सामर्थ्याच्या बाबतीत खालच्या श्रेणीत आहे. अमेरिकेपाशी ॲटम् बॉम्ब आहे. रशियापाशी तशीच गुप्त शस्त्रे आहेत असे म्हणतात. इंग्लंडजवळ यांतले कांहीं नाहीं. शिवाय इंग्लंडच्या साम्राज्याचा पसारा जगभर पसरला असल्याने व त्या साम्राज्याच्या पोटांत गुलाम राष्ट्रांचे अनेक ज्वालामुखी धुमसत असल्यानें, इंग्लंड मोठ्या पंचांत सांपडलेले दिसतें व रशिया या उणीवेचा पुरेपूर फायदा घेत आहे. ऐतिहासिक वैर इतिहासाचा ओघ पाहिला तर रशिया व इंग्लंड याचें सूत केव्हांच जमत नाहीं असेंच दिसतें. अमेरिकेचेंद्दि रशियाशी फारसें जुळते असें नाहीं; पण संपत्ति- मान् व सामर्थ्यसंपन्न अमेरिका रशियाची फारशी पर्वा करीत नाही. उलट इंग्लंड व रशिया यांच्या सरहद्दी भौगोलिकच नव्हे तर आन्तरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या दृष्टीनेंहि एकमेकांस टेकलेल्या आहेत. यामुळे रशिया व इंग्लंड यांचे खटके वारं- वार उडत असलेले दिसतात. सुविख्यात लेखक मि. लुई फिशर यांनी या दोन राष्ट्रांच्या संबंधाचें चित्रण करतांना म्हटले आहे की, इंग्लंडचा सिंह व रशियाचें अस्वल दें यापुढे एकत्र गुण्यागोविंदाने नांदतील असें दिसत नाही. कारण इंग्लंडप्रमाणेंच रशियाहि आतां बाल्टिक समुद्र, अटलांटिक महासागर, भूमध्य समुद्र, प्रशांत महासागर आणि इराणचें आखात येथें आपली नाविक सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नांत यशस्वी होत आहे. यामुळे, मि. लुई फिशर म्हणतात कीं, रशियाचें अस्वल हें गुरगुरू लागले असून ब्रिटनच्या सिंहाबरोबर या सुरक्षितता समितींतहि खेळीमेळीनें राहूं इच्छित नाहीं. विशेषतः या सिंहाचा पराक्रम फारसा भीतिदायक राहिला नाहीं व त्याची गर्जनाहि आतां अगदींच शेळीच्या बेंबेंसारखी ऐकूं येते. याशिवाय सध्यांच्या रशियाचे हुकूमशाही सूत्रधार मा. स्टॅलिन यांचें परराष्ट्रीय धोरण हें एक गूढ असल्याने व प्रत्यक्ष स्वरूपांत मागील झारांच्या साम्राज्यशाही धोरणाशीं तें सुसंगत असल्यानें, इंग्लंड व रशिया यांचें ऐतिहासिक वैर पुनः या ना त्या स्वरूपांत जागृत झालेले दिसत आहे.